
अकराव्या वर्गात शिकणारी ही मुलगी २८ फेब्रुवारीला सकाळी शाळेत प्रॅक्टिकल असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, रात्र होऊनही ती घरी परतली नाही.
वरोरा (चंद्रपूर) : चेन्नई-नवी दिल्ली रेल्वेमार्गावर सोमवारी (ता. १) सकाळी एकर्जुना शिवारात एका तरुण जोडप्याचे मृतदेह आढळून आले. वरोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी केली. मृत तरुणाचे नाव आकाश नीळकंठ मेश्राम (वय २२) असून तो वर्धा जिल्ह्यातील गोविंदपूर (ता. समुद्रपूर) येथील, तर मुलगी ही अल्पवयीन असून ती भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहे.
हेही वाचा - यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरू? पुसदचा बंगला केंद्रस्थानी;...
आकाशचे भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते, अशी चर्चा आहे. अकराव्या वर्गात शिकणारी ही मुलगी २८ फेब्रुवारीला सकाळी शाळेत प्रॅक्टिकल असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, रात्र होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही शोध लागला नाही. आज भद्रावती पोलिसांत हरविल्याची तक्रार कुटुंबीय देणार होते. सोमवारी सकाळच्या सुमारास एकार्जुना शिवारात चेन्नई-नवी दिल्ली या रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक ८३४ येथे दोन मृतदेह आढळून आले. घटनास्थळावर एमएच ३२ एस ९६८५ क्रमांकाची दुचाकी आढळून आली. वरोरा रेल्वे पोलिसांनी याबाबतची माहिती वरोरा पोलिसांना दिली. दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मृत आकाशच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीवरून त्याची ओळख पटली, तर मुलीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना बोलाविण्यात आले. आकाश हा वरोरा येथील एका खासगी सुरक्षा कंपनीकडे आज रुजू होणार होता, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.