पर्यावरण जगले तरच पिढी जगेल

Global-Environment-Day-Special
Global-Environment-Day-Special

नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे. वेळीस सजग होऊन याकडे लक्ष दिले नाही तर आगामी काळात कठीण परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे पर्यावरण जगले तरच पिढी जगेल, असे भाकीत वर्तवीत किमान एकतरी वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा आग्रह मान्यवरांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केला.

पर्यावरण शिक्षण महत्त्वाचे 
पर्यावरणविषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्यनिर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावी. पर्यावरण शिक्षण जीवनभर चालणारी शिक्षणप्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा. पिकांवरील वाढत्या फवारणीमुळे कीटकांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे फुलांचे परागकण विखुरले जात नाहीत. ज्यामुळे बीजारोपण होत नाही. बालपणापासून मुलांना पर्यावरण शिक्षण देऊन त्यांच्यात पर्यावरणाप्रती आपुलकी निर्माण केली पाहिजे. प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून जोपासला पाहिजे.  
- नरेंद्र लिल्हारे, अध्यक्ष नेचर फाउंडेशन, नागपूर

वाढते प्रदूषण रोखले पाहिजे
आजघडीला देशातील एकही नागरिक असा नाही जो प्रदूषणामुळे त्रस्त नाही. शुद्ध हवा खाण्यासाठी तुम्हाला सकाळ लवकर उठावे लागते. कारण दिवस उजाडताच प्रदूषणही सुरू होते. मग हे प्रदूषण हवेचे, पाण्याचे किंवा  जमिनीचे असे विविध प्रकारचे आहे. अनैसर्गिक शेती, कारखाने, प्लॅस्टिकचा अतिवापर, उंचच उंच उभारले जाणारे इमारतींचे टॉवर, वाढते सिमेंटचे जंगल अशी एक ना अनेक कारणे  प्रदूषणामागे आहे. वाढत्या प्रदूषणावर वेळीच तोडगा काढला तरी भविष्यातील पिढ्या जगतील. 
- नेहा राकेश निकोसे, नगरसेविका, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस

पर्यावरणात होणारे बदल धोक्‍याचे 
गेल्या काही वर्षांपासून जल-वायू-प्रदूषण ऐरणीचा मुद्दा आहे. तापमानवाढ आणि बिघडलेले पावसाचे गणित हेसुद्धा बदलत्या पर्यावरणाचे संकेत आहेत. काही ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी तर, काही ठिकाणी दुष्काळ ही धोक्‍याची लक्षणे आहेत. पर्वतीय प्रदेशात वाढत्या उष्णतेमुळे वितळणाऱ्या बर्फामुळे पर्वतीय भागातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येताहेत. ज्याचा परिणाम जंगल आणि जलचर प्राण्यांवर होतोय. बदलत्या पर्यावरणामुळे मानवी जीवन धोक्‍यात आले आहे. विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जात आहेत. जंगले उद्‌ध्वस्त केली जात आहे. 
- जयश्री सोनुले, मुख्याध्यापिका जाईबाई हिंदी प्राथमिक स्कूल, समतानगर, नारी रोड 

सिमेंट रस्त्यांमुळे वाढतेय उष्णता
पर्यावरण रक्षण काळाजी गरज झाली असून, निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, ही जाणीव ठेवून प्रत्येकाने वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणात हिरिरीने सहभाग नोंदवला पाहिजे. शहरात चौफेर विकासकामे सुरू असून, सिमेंट रस्त्यांचे होत असलेले बांधकाम त्यापैकी एक आहे. परंतु, वाढत्या सिमेंट रस्त्यांमुळे उष्णता वाढत असून, जमिनीत पाणी मुरत नसल्याने पाणीपातळीत घट होत आहे. वाढत्या कचऱ्याची विल्हेवाट, प्लॅस्टिकमुक्‍ती केली तर खऱ्या अर्थाने पर्यावरणदिन साजरा केल्यासारखे होईल. 
- विजय मालेवार, मुख्याध्यापक, श्रीनिकेत माध्यमिक विद्यालय, विश्‍वकर्मानगर

कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न बिकट
प्रत्येक माणसाकडून दिवसाला शेकडो टन  कचरा निर्माण केला जातो. ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे.  तसेच काही कचरा विघटन होण्यासाठी मोठा अवधी द्यावा लागतो. आजकाल रिसायकल म्हणजेच पुनर्वापराची संकल्पना वाढत चालली आहे. एखाद्या वस्तूचा कचरा होण्यापेक्षा त्या वस्तूवर  विशिष्ट प्रक्रिया करून तिचा पुनर्वापर करता येतो. त्यामुळे कचऱ्याची निर्मिती कमी होईल तसेच पर्यावरणावर कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणामदेखील कमी होतील. मी कमीत कमी कचरा करेल आणि केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावेल, असा संकल्पच आजच्या दिवशी केला पाहिजे. 
- आयुष संतोष नरवाडे, पर्यावरण मित्र 

तापमानवाढ रोखण्यास उपाययोजना व्हाव्या
दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत असून, उन्हाचे प्रमाण वाढत आहे. यंदा कधी नव्हे एवढा उकाडा जाणवत आहे. देशात अनेक ठिकाणी पाऱ्याने ५० अंशांचा आकडा पार केला.  नागपुरातही गेल्या काही दिवसांपासून पारा पंचेचाळिशीच्या वरच आहे. ही धोक्‍याची घंटा आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. नर्सरीतील झाडे जगविण्याचा प्रश्‍न आहे. वाढती तामपानवाढ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर भविष्यातील पिढ्यांचे जगणे कठीण होईल.        
- राहुल लोणारे, समर्थ नर्सरी, जुना सुभेदार, शारदा चौक

पर्यावरणावर आज चर्चासत्र 
नागपूर - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या बुधवारी (ता. ५) वनराई फाउंडेशनच्या वतीने ‘पर्यावरण रक्षणासाठी वृत्तपत्रांचे योगदान’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता चर्चासत्र होईल. वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून प्रदीप मैत्र, विकास वैद्य, मनेका बहेल, मंदार मोरोणे, अनू काळे, प्रा. सचिन त्रिपाठी चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष  गिरीश गांधी राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com