या केंद्रावर होते शेतकऱ्यांची लूट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

आमगाव (जि. गोंदिया)  तालुक्‍यातील गावागावांत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले. या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना बाजूला सारत व्यापाऱ्यांचे हित जोपासून हजारो क्‍विंटल धान खरेदी केले जाते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आमगाव (जि. गोंदिया) : एवढेच नव्हे, तर धान खरेदी केंद्रावरून धानाची पोती चोरीला गेल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. सन 2018 मध्ये तालुक्‍यात तीन शासकीय धान खरेदी केंद्रे होते.

यावर्षी तालुक्‍यातील आमगाव, कट्टीपार, कालीमाटी, सुपलीपार, तिगाव, गोरठा आदी ठिकाणी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्‌घाटन आमदार कोरोटे यांच्या हस्ते झाले. या केंद्रावर शेतकरी हित बाजूला सारून व्यापाऱ्यांची बाजू जोपासली जाते. 

येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना तब्बल 9 ते 10 दिवस धान काटा करायला लागतात. त्यामुळे गोदामाबाहेर ठेवलेल्या धानाची पोती चोरी झाल्याच्या घटना घडत आहेत.

परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधारभूत केंद्रावर टोकण पद्धतीने धान खरेदी सुरू आहे. तरीपण केंद्रावर शेतकरी पोहोचण्यापूर्वी व्यापाऱ्यांचे सात-बारे केंद्रात लावण्यात येतात. त्यामुळे तब्बल 9 ते 10 दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते. 

हमालही घेतात पैसे 

एवढेच नव्हे, तर हमालांना शासनाकडून 2 ते 5 रुपये कट्ट्याप्रमाणे दिले जाते. परंतु, आमच्याकडून 15 ते 18 रुपये घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी या त्रासाला कंटाळून अल्पदरात गावातील व्यापाऱ्यांना धान विक्री करीत आहेत. 

 

धानाचे तीन कट्टे चोरीला 

तथापि, व्यापारी त्यांच्याकडून सात-बारा, बॅंक पासबुक, आधारकार्ड मागून शेतकऱ्यांनी विकलेले धान खरेदी केंद्रात विकतात. बोनस व विक्रीची रक्‍कम शेतकरी प्रामाणिकपणे व्यापाऱ्यांना परतही करतात. त्यामुळे लाखोचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे.

कट्टीपार येथील केंद्रावर सीमित गायधने यांचे दोन क्‍विंटल, रमेश पटले यांचे धानाचे तीन कट्टे चोरीला गेले. येथील केंद्रावर अधिकारी, चौकीदारांची नेमणूक करण्यात आली. परंतु, केंद्रावर संचालकांचे नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जाते, असा आरोपही होत आहे. 

 क्लिक करा : पांढरा घुबड पाहिलात का? चला मग साकूरला
 

आमदारांनी न्याय मिळवून द्यावा 

दरम्यान, आमदार सहसराम कोरोटे यांनी लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते पंकज गायधने, सीमित गायधने, राजू फुंडे, ओमप्रकाश सोनवाने, ओमलाल हरिणखेडे, तेजू पटले, काशीनाथ पटले, खुमराज रहांगडाले, छत्रपाल शेंडे, विष्णू बोपचे, जितेंद्र कटरे, ओमप्रकाश पटले, गुरू सोनवाने, देवीलाल ठाकरे, बाबूलाल हरिणखेडे, जयचंद ठाकरे, जीवन हुकरे, नंदू मोटघरे, संजू बांगरे, परमेश्‍वर मुनेश्‍वर यांनी केली आहे. 

 

खऱ्या शेतकऱ्यांना लाभ 
शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदी जोमात सुरू आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी सात-बारा व इतर कागदपत्रे व्यापाऱ्यांना देऊ नये. केंद्रावरील गर्दी वेळेवर कमी होईल. खऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ नक्‍की मिळेल. 
- सुरेश हर्षे, जिल्हा परिषद सदस्य. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia : At this center was the plunder of farmers