गोंदिया : चारचाकी वाहनाच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू; वडील व बहीण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

गोंदिया : चारचाकी वाहनाच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू; वडील व बहीण जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिरोडा (जि. गोंदिया) : भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका साॅफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच मृत्यू, तर वडील व बहीण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. १३) सकाळी साडेसहाच्या सुमारास येथील गणेश सर्वो पेट्रोलपंपाजवळ घडली. माॅर्निंग वाॅक करून घराकडे परत येत असताना हा अपघात घडला.

निखिल राजू उपरकर (वय ३२) असे मृताचे, तर राजू हरिलाल उपरकर (वय ६०) व नेहा राजू उपरकर (वय २९, तिघेही रा. साई काॅलनी, नेहरू वाॅर्ड, तिरोडा) अशी जखमींची नावे आहेत. राजू उपरकर हे मुलगा निखिल व मुलगी नेहासोबत दररोजप्रमाणे आज, शनिवारीदेखील सकाळी ५.३० च्या सुमारास तिरोडा-तुमसर मार्गावर मार्निंग वाॅकला गेले होते.

मॉर्निंग वाॅक करून परत येत असताना गणेश सर्वो पेट्रोलपंपाजवळ मागेहून येणाऱ्या एमएच ४९- बी. के. ९१२५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने तिघांनाही धडक दिली. चालक प्रणय मुकेश ऊके (वय २२, रा. संत सज्जन वाॅर्ड, रेल्वे स्टेशनजवळ तिरोडा) याला झोपेची झपकी आल्याने पायी चालत असलेल्या निखिलच्या अंगावरून वाहन गेले. त्यामुळे निखिल अंदाजे दहा फूट फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची बहीण नेहा हिच्या पायाला चारचाकी घासत गेली. यात तिच्या पायाला दुखापत झाली.

हेही वाचा: 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग

अवघ्या तीन फुटावर पुढे-पुढे चालत असलेले वडील राजू उपरकर यांच्या हाताला घासून गाडी पुढे जात असताना राजू उपरकर यांनी मागे वळून पाहिले तेव्हा क्षणभर मुलगा व मुलगी दिसली नाही. नंतर मुलगी खाली पडलेल्या अवस्थेत असताना मुलीला उचलले व निखिल कुठे आहे हे मुलीला विचारले असता समोर निखिल अंदाजे दहा फूट अंतरावर पडून होता. त्यापाठोपाठ येत असलेल्या लग्नातील पाहुण्यांच्या गाडीला थांबवून तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून निखीलला मृत घोषित केले. अपघात झालेल्या वाहनात रात्री लग्न लावून तिरोडा येथील नवरदेव-नवरी नागपूरवरून येत असल्याची माहिती आहे. मृत निखिल हा पुणे येथे कॅप जेमिनी कंपनीमध्ये साॅफ्टवेअर इंजिनिअर होता. निखिलच्या पार्थिवावर सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जोगंदळ करीत आहेत.

loading image
go to top