गोंदिया, तिरोडा तालुक्‍यांतील गावांना पुराचा वेढा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

गोंदिया : सालेकसा तालुक्‍यातील पुजारीटोला धरणाचे 6 तसेच मध्य प्रदेशातील भीमसागर धरणाचे 9 दरवाजे रविवारी उघडण्यात आले. त्यामुळे बाघ व वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रजेगाव, बिरसोला, कासा, तेढवा, डांगोरली या नदीकाठावरील गावांना पुराने वेढा घातला आहे.

गोंदिया : सालेकसा तालुक्‍यातील पुजारीटोला धरणाचे 6 तसेच मध्य प्रदेशातील भीमसागर धरणाचे 9 दरवाजे रविवारी उघडण्यात आले. त्यामुळे बाघ व वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रजेगाव, बिरसोला, कासा, तेढवा, डांगोरली या नदीकाठावरील गावांना पुराने वेढा घातला आहे.
गोंदिया ते धापेवाडा मार्गावरून जाणाऱ्या नाल्यावर सहा फूट पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग बंद आहे. वैनगंगा नदीचा जलस्तर वाढल्याने डांगोरली व धापेवाडा गावांत पाणी शिरले आहे. तिरोडा तालुक्‍यातील घाटकुरोडा ते घोगरा पुलावर पुराचे पाणी चढले आहे. त्यामुळे घाटकुरोडा या गावाचा मुंडीकोटा गावापासून संपर्क तुटला आहे. भंबोडीनजीकच्या पुलावर पुराचे पाणी आहे. त्यामुळे भंबोडी व मुंडीकोटा गावाचा संपर्क तुटला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. रात्रीपासूनच पोलिसांची गस्त ठेवण्यात आली होती. गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आवाहनही करण्यात आले होते. दरम्यान, बिरसोला येथील ठगणबाई मात्रे (वय 60), कुमारीबाई कृष्णकुमार मात्रे (वय 35), निकिता मात्रे (वय 10), दिव्या मात्रे (वय 7), सामियल (वय 3) हे सगळे जण कासा रस्त्याला लागून असलेल्या आपल्या शेतातील झोपडीवजा घरात होते. याचवेळी रविवारी रात्री शेतातील त्यांच्या घराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. तथापि, सोमवारी रावणवाडी पोलिसांच्या रेस्क्‍यू टीमने त्यांना बाहेर काढले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया व तिरोडा तालुक्‍यात वैनगंगा नदीच्या काठावरील गावात पूरपरिस्थिती पाहता आपत्कालीन बैठक बोलावून ढिवरटोला येथील नागरिकांना रेस्क्‍यू करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्काळ तिरोडा तालुक्‍यातील किडंगीपार येथील ढिवरटोला गावाचा (वैनगंगा काठावरील) संपर्क चारही बाजूने तुटला आहे. गावात पाणी शिरण्याची परिस्थिती पाहता गावातील जवळपास 25 कुटुंबांतील 50 ते 60 नागरिकांना रेस्क्‍यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia, villages of Tiroda taluka are surrounded by floods