शुभवार्ता! दिव्यांगाच्या जीवनात आनंद फुलविणार "सदाशिव'

बालकदास मोटघरे
रविवार, 22 सप्टेंबर 2019

आनंदवन (जि. चंद्रपर) : खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयातच सदाशिव ताजणे यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले. मात्र त्यांनी धीर खचू दिला नाही. आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि प्रयत्नांनी ध्येय गाठले. दिव्यांगांच्या जीवनात आशेचा किरण बनून त्यांचे जीवन प्रकाशमय केले. शरीर जरी अपंग असले; तरी मन मात्र अजूनही खंबीर आहे. ते मागील अनेक वर्षांपासून आनंदवनाशी जुळले आहेत. तिथल्या दिव्यांगाच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम ते निरंतर करीत आहेत.

भद्रावती तालुक्‍यातील राळेगाव येथील ताजणे कुटुंबात सदाशिव ताजणे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती एकदम बेताचीच. चिमुकल्या वयात सदाशिवला पोलिओने ग्रासले. आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावर उपचार झाला नाही. त्यांचे दोन्ही पाय पंगू झाले. लहानपणापासूनच खंबीर मनाच्या सदाशिवने हिंमत हरली नाही. चालता येत नव्हते. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कर्मयोगी बाबा आमटेच्या सहवासात येऊन प्रिंटिंग, शिवणकला, हस्तकला, केन वर्क करण्याच्या कला अवगत केल्या. आनंदवनातील संधी निकेतन कर्मशाळेच्या व्यवस्थापकाची जबाबदारी त्यांच्यावर आली. अंध, अपंग, मूकबधिर यांचे जीवन सुखमय व्हावे म्हणून त्यांनी गावोगावी फिरून दोनशे विद्यार्थी जमविले. त्यांना कार्यशाळेत प्रशिक्षण देऊन विकलांग शरीरावर मात करीत आत्मसन्मानाने जगण्याचे बळ दिले. स्वरानंदनवनच्या माध्यमातून दोनशेच्यावर यशस्वी प्रयोग केले. अंध-अपंगांना मंच उपलब्ध करून देत आनंदवनाचे नाव मोठे केले.
स्वयंरोजगार योजनेतून दिव्यागांना सायकल वाटप केले. दिव्यांगाच्या कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा प्रश्‍न मार्गी लावला. शरीर अपंग असले तरी मन खंबीर आहे. नियतीवर मात करून अंध-अंपगत्वाच्या जीवनात आनंद फुलविला. त्यांना जगण्याचा आत्मविश्‍वास दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news! "Sadashiv" will bring joy to handicap's life