बघायला गेले कोरोना विषाणू संसर्ग अन् सापडल्या म्हशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

अकोल्यात महानगरपालिका कोंडवाडा विभागामर्फत परिसरात अस्‍वच्‍छता पसरविणाऱ्या दुग्ध व्‍यावसायिकांच्या चार म्‍हशी जप्‍त करण्‍यात आल्‍या.   

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छतेची पाहणी करणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांना अस्वच्छता पसरविणाऱ्या म्हशी आढळून आल्या. या म्हशींना मनपाच्या कोंडवाडा विभागात पाठविण्यात अल्या असून, दुग्ध व्यवसायिकाविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. 

 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अकोला महानगरपालिकेच्या सर्वच विभागातर्फे प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून कोटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून अकोला शहरात अद्याप एकही कोरोना बाधिक रुग्ण आढळला नाही. याकाळात स्वच्छतेबाबत कुठेही निष्काळजीपणा होऊ नये म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. सोमवारी मनपाच्या  कोंडवाडा विभागाने आरोग्‍य विभागाच्या सहाकार्याने  रामदास पेठ पोलिसांची मदत घेत अस्वच्छता पसरविणाऱ्या दुग्ध व्यवसायिकाविरुद्ध कारवाई केली. अकोला शहरातील कामा प्‍लॉट येथील लालताप्रसाद शुक्‍ला व मोहीत शुक्‍ला यांच्‍याव्‍दारे परिसरात म्‍हशी बांधून अस्‍वच्‍छता पसरविण्यात होती. त्यांच्या चार म्‍हशी ताब्‍यात घेउन कोंडवाड्यात टाकण्‍यात आल्‍या आहेत. 

 

कारवाई दरम्यान वाद
मनपाचे अधिकारी, कर्मचारी दुग्ध व्यवसयिकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेले असता व्‍यावसायिकांव्‍दारे त्यांच्यासोबत वाद घालण्‍यात आला होता. त्‍यामुळे रामदास पेठ पोलिसांची मदत घेवून कारवाई करण्यात आली. वाद घालणाऱ्या दुग्ध व्यवसायिकांवरही कारवाईचे संकेत मनपा प्रशानसाने दिले आहे.  

 

यांनी केली कारवाई 
अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरुद्धची कारवाई मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये व मनपा उपायुक्‍त वैभव आवारे यांच्‍या मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईत आरोग्‍य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, कोंडवाडा विभाग प्रमुख हेमंत शेळवणे, रामदास पेठ पोलिस स्‍टेशनचे ठाणेदार एम.एस.ठाकरे व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Got to look for corona virus infection and found buffalo