esakal | कुठे गेली प्लास्टिक बंदी? प्रशासन करतंय कानाडोळा; ग्राहक-विक्रेत्यांकडून सर्रास वापर 

बोलून बातमी शोधा

Government is ignoring Plastic banned in gadchiroli }

विक्रेते आणि ग्राहक यांच्याकडून या कॅरी बॅग वापरल्या जात असल्याचे दिसून येते. कचऱ्यातही प्लास्टिक कॅरिबॅग पोहोचले आहे.

कुठे गेली प्लास्टिक बंदी? प्रशासन करतंय कानाडोळा; ग्राहक-विक्रेत्यांकडून सर्रास वापर 
sakal_logo
By
मंगेश जाधव

सिरोंचा (जि. गडचिरोली)  : प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीची कारवाई सध्या थंडावल्याने शहरात पुन्हा एकदा उघडपणे प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर सुरू झाला आहे. प्रशासनाकडून कारवाई थंडावल्याने विक्रेते आणि ग्राहक दोघेही प्लास्टिकचा निर्धास्त व अनिर्बंध वापर करत आहेत.

विक्रेते आणि ग्राहक यांच्याकडून या कॅरी बॅग वापरल्या जात असल्याचे दिसून येते. कचऱ्यातही प्लास्टिक कॅरिबॅग पोहोचले आहे. राज्य सरकारने प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातल्यानंतर स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने पथक तयार करून दुकानदारांवर मागील वर्षी याच महिन्यात अचानक कारवाई केली होती. 

हेही वाचा - मार्च महिन्यातच पारा वरचढ, कूलरही निघाले बाहेर; जलवाहिनी नसलेल्या भागात वाढतेय समस्या

किरकोळ कारवाईचा धसका घेऊन काही काळ प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर कमी झाला होता. त्यांची जागा कापडी आणि कागदी पिशव्यांनी घेतल्याचे दिसून येत होते. शहरातून हजारो किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. अनेक दुकानदारांवर किरकोळ कारवाईसुद्धा करण्यात आली होती. आता मात्र कारवाई पूर्णपणे थंडावल्याने प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे याकडे स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहरातील अनेक व्यावसायिकांपासून तर मटण, चिकन तसेच भाजीपाला विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये हवी असलेली वस्तू देत आहे. त्यामुळे ग्राहकही घरून पिशवी घेऊन बाजारात भाजीपाला घेण्यासाठी येताना दिसत नाही. त्यामुळे व्यावसायिक बिनधास्त प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसून येत आहेत. प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यावर ग्राहकाकडूनही कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात झाली होती. घरून पिशवी घेऊनच ग्राहक बाजारात येत होते. काही व्यावसायिक आजही या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदीची शिस्त लावण्यासाठी सुरुवात झाली होती. मात्र ही शिस्त काही काळ तग धरू शकली. आता मात्र पुन्हा एकदा व्यावसायिक कॅरीबॅगमध्ये सामान देऊ लागले आहेत. ग्राहकही स्वीकारताना दिसून येत आहेत. 

दैनंदिन कचऱ्यामध्ये कचरा कमी, तर प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असून याकडे स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. किराणा दुकानातील बहुतांश चीजवस्तू ही प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये पॅकिंग करून असते. केळी असो वा भाजीपाला काळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये ग्राहकांना दिले जाते. भाजीपाला काढला की प्लास्टिकची कॅरिबॅग डस्टबिनमधून नगरपंचायतीच्या कचरा गाडीत येत असते. शहरात सध्या प्लास्टिक नागरिकांकडून कुठेही फेकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 

प्लास्टिक बंदीनंतरही प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा पुरवठा होतो कसा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. वापरावर बंदी घालण्यात आली, तर उत्पादनावर का नाही, हाही मोठा प्रश्‍न आहे. बाजारात मागणी होत असल्याने या दुकानापर्यंत कॅरीबॅग पोहोचविण्यासाठी यंत्रणाही कार्यरत झाली असावी. त्यामुळे प्रशासनाने कारवाई मोहीमेत सातत्य ठेवण्याची सध्या नितांत गरज आहे.

हेही वाचा - बॅक बेंचर्सचे भाग्य उजळणार! पदव्युत्तर, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयातच

मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन...

प्लास्टिक कॅरिबॅग बंदी मोहीम नगरपंचायतीमार्फत लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी दिली आहे. नागरिकांनी नगरपंचायतीला सहकार्य करावे. प्लास्टिक कॅरिबॅग वापर करीत असलेल्या दुकानदार व भाजीपाला विक्रेते तसेच मटण, चिकन विक्रेते ग्राहकांना प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये वस्तू देत असल्यास नगरपंचायतीला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ