७१ टक्के मातामृत्यू सरकारी रुग्णालयांत, तरी ऑल इज वेल?

प्रमोद काळबांडे
बुधवार, 15 मे 2019

सरकारी रुग्णालयांतील मातामृत्यू कशामुळे?

  • २४.१७ % अधिक रक्तस्त्रावामुळे
  • १२.०८ % सिझर झाल्यावर मारलेले टाके फेल झाल्याने, 
  • १४.३ %  उच्च रक्तदाबामुळे
  • ४७.२ %  ॲनिमिया, अशक्तपणा आदी कारणांमुळे.

नागपूर - ‘डॉ. सतीश गोगुलवार समिती’ आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहोचली. स्वतः डॉ. गोगुलवार आणि समितीतील दुसरे सदस्य डॉ. मनोहर मुदेश्‍वर यांनी रुग्णालयात फिरून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी ‘तपासणी शीट’मधील १५ मुद्द्यांवर चर्चा केली. तेव्हा बहुतेक सारं आलबेल दिसलं. पुरेशी यंत्रसामग्री, आवश्‍यक तज्ज्ञ डॉक्‍टर आणि कर्मचारी वगैरे वगैरे. सरकारी रुग्णालये एवढी सुसज्ज असतील तर मग राज्यातील प्रसूत मातांची मृत्यूची टक्केवारी ७१.३२ कशी, असा प्रश्‍न यावेळी पडला.

सरकारी रुग्णालयांतील सोयीसुविधांबाबत तपासणी करण्यासाठी तीन सदस्यांची डॉ. गोगुलवार समिती राज्य सरकारने गठित केली. या समितीने मंगळवारी (ता. १४) दुसरी ‘तपासणी-भेट’ मेडिकलला दिली. ज्यांच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिला आणि डॉ. गोगुलवार समिती नेमली गेली ते नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ वाघमारे यांनी चार अहवाल उच्च न्यायालयलात सादर केले होते. या अहवालात मेडिकलच्या पाहणीतील तथ्येही नोंदविली आहेत.

वाघमारे यांनी याविषयी माहिती दिली. ‘‘राज्यातील एकूण प्रसूतींपैकी सरकारी रुग्णालयांमध्ये ५५ टक्के प्रसूती होतात. ग्रामीण भागातील शंभर टक्के महिला अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालयांपर्यंत पोहोचत नाहीत. अधिक गुंतागुंतीच्या प्रकरणांतील महिलांची प्रसूती सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्‍यक सोयीसुविधा आणि तज्ज्ञ डॉक्‍टर ग्रामीण रुग्णालयांत उपलब्ध नसतात. प्रसूती कक्षात स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा, अपुरा औषधसाठा, अस्वच्छ चादरी दिसतात. ग्रामीण भागातून महिलांना प्रसूतीसाठी  रेफर टू नागपूर केले जाते.

परिणामी मेयो, मेडिकलवरील यंत्रणेवर ताण येतो. मेडिकलमध्ये पाच वर्षांत झालेल्या ६३ हजार प्रसूतींपैकी तब्बल ५०० माता मृत्युमुखी पडल्या. हा याचाच परिणाम आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालये सुसज्ज करणे आवश्‍यक आहे’’, असे प्रतिपादनही वाघमारे यांनी केले.

एक सदस्य अनुपस्थित 
डॉ. गोगुलवार आणि डॉ. मुद्देश्‍वर यांच्यासह डॉ. अरुण आमले यांचाही समितीत समावेश आहे. परंतु मेयो आणि मेडिकल या दोन्ही ठिकाणी तपासणी-भेटीत ते उपस्थित नव्हते. ‘त्यांच्या अनुपस्थितीबाबत आमच्याकडे लेखी काहीही आले नाही’, असे डॉ. मुद्देश्‍वर यांनी सांगितले. 

डॉ. सतीश गोगुलवार समितीने भेट दिल्यानंतर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना मेडिकलमधील व्यवस्थेबाबत माहिती विचारली. त्यांनी आगामी योजनांबाबत माहिती दिली.
मनपाकडून कमी पाणी घेऊ   

मेडिकल कॅम्पसमध्ये ग्रीनरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भूजल पातळीही चांगली आहे. कॅम्पसमध्ये असलेल्या १६-१७ विहिरींमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. सद्य:स्थितीत महानगरपालिकेडून पाणी घेतो. त्यात मोठा पैसा खर्च होतो. स्वतःचा मोठा पाणीसाठा असल्यामुळे त्याचाच जास्तीत जास्त वापर करण्यावर आम्ही विचार करत आहोत. यातून वाचलेला पैसा इतर कामावर वापरता येईल, अशी माहिती डॉ. मित्रा यांनी दिली. 

लवकरच व्हिजन डॉक्‍युमेंट 
मेडिकलमध्ये ८० टक्के जागा व्यापली असून केवळ २० टक्के जागा रिकामी आहे. अनेक बांधकामे आवश्‍यक आहेत; परंतु आम्ही यापुढील सर्व बांधकामे व्हर्टिकल करणार आहोत. त्यामुळे अधिकाधिक मोकळी जागा राहील आणि त्या जागेचा ‘ग्रीनरी’साठी उपयोग होईल. यासाठीचे ‘व्हिजन डॉक्‍युमेंट’ करण्यात येत असून लवकरच ते राज्य सरकारला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.   

इतर रुग्णालयांनी आदर्श घ्यावा, असे काय काय मेडिकलमध्ये आहे, असे डॉ. मित्रा यांना विचारले असता, त्यांनी मुबलक पाणी, मशिनीचा वापर करण्यात येत असल्यामुळे उत्तम स्वच्छता आणि रुग्ण हाताळण्यासाठी डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांची मोठी संख्या या तीन बाबी ठळक असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Medical Hospital Mother Death Percentage Increase