ठाकरे सरकारने अडविली विकास कामे 

श्रीधर ढगे
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

राज्यात मूलभूत सुविधांची जवळपास 2500 कामे आहेत, या शिवाय पर्यटन, तीर्थक्षेत्र विकास आणि वैशिष्ट्य पूर्ण कामे आहेत मात्र, ठाकरे सरकारने लोकप्रतिनिधींच्या निधीला ब्रेक लावल्याने खामगावातील दहा कोटी रुपयांची कामेही रखडणार

खामगाव (जि.बुलाडाणा) :  महाविकास आघाडी राज्‍यातील वैशिष्ट्यपुर्ण आणि मुलभुत सुविधा अंतर्गत मंजुर झालेल्‍या कामांना ब्रेक दिला आहे. सरकारचा तातडीचा जीआर बुधवारीच संबंधित विभागांना देण्यात आला आहे.  ठाकरे सरकारने राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या 2500 कामांना तातडीने जीआर काढत स्थगिती दिली असून आमदारांच्या निधीला ब्रेक लावला आहे.सरकारच्‍या या निणर्यामुळे खामगाव मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातील दहा कोटी रुपयांच्‍या विकास कामांनाही स्थगिती मिळाली आहे.

खामगाव मतदार संघात आमदार आकाश फुंडकर यांनी मागील युती सरकारच्‍या काळात मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला होता. सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी वैशिष्टपुर्ण व मुलभुत सुविधा अंतर्गत दहा कोटी रुपयांची कामे मंजुर करण्यात आली होती. त्‍यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील, सभागृह, रस्‍ते , पेव्‍हरब्‍लॉक, व्‍यायाम शाळा, मंदिरांचे सभागृह, चौक सौदंर्यीकरण यासह विविध कामांचा समावेश होता. मागील काळात मंजुर झालेल्‍या कामांचा आढावा महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात येत असून उपरोक्‍त दोन्‍ही योजना अंतर्गत मंजुर कामे स्‍थगित करण्यात आली आहेत. ज्‍या कामांचा कार्यमंजुरी आदेश निघाला आहे. त्‍या संदर्भात शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्‍या प्रगतीबाबत माहिती वरिष्ठांना सादर करावी लागणार असून त्‍या कामांबाबत सुध्दा फेरविचार केल्‍या जाणार आहे.

175 महत्‍वाची विकास कामे स्‍थगित
खामगाव मतदार संघातील जवळपास 175 महत्‍वाची विकास कामे या निर्णयाने स्‍थगित झाली आहेत. त्‍यामध्ये जिल्‍हा परिषद, नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत प्रस्‍तावित कामांचा समावेश आहे. 
 

Image result for akash fundkar
ॲड. आकाश फुंडकर, आमदार खामगाव (जि.बुलडाणा) 

अन्यायकारक निर्णय, नागरिकांमध्ये असंतोष
महाविकास आघाडी सरकारने विकास कामांना स्‍थगिती देण्याचा घेतलेला निर्णय अन्‍यायकारक आहे. सरकारच्‍या नावात विकास असला तरी त्‍यांनी विकासाचे राजकारण केले नाही. या निर्णयामुळे आमच्‍या खामगाव मतदार संघातील दहा कोटीच्‍या कामांना ब्रेक लागला आहे. यामध्ये महत्‍वाच्‍या कामांचा समावेश असल्‍याने शहरी व ग्रामीण भागातील जनतेत सरकारच्‍या या निर्णयाविरोधत नक्‍कीच असंतोष आहे. 
- ॲड. आकाश फुंडकर, आमदार खामगाव (जि.बुलडाणा) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government MLA breaks into funding