व्याकरण नियमावली ही वैदर्भीयांची देणगी

राघवेंद्र टोकेकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर  : पश्‍चिम महाराष्ट्राकडून आणि विशेषतः पुणे, मुंबईकडे वैदर्भीय मराठी बोलीची टिंगल केली जाते. मात्र, आता टीव्ही मालिकांमध्ये टीआरपी वाढविण्यासाठी वैदर्भी बोलीचा वापर वाढत आहे. वैदर्भी, वऱ्हाडी बोली बोलणारी पात्रे मालिकांमध्ये येत आहेत. मात्र, ज्या बोलीची टिंगल करण्यात येते ती बोलणाऱ्यांनीच मराठी भाषेच्या व्याकरणाचे नियम तयार केले आहेत, ही बाब आज अनेकांना माहीत नाही.

नागपूर  : पश्‍चिम महाराष्ट्राकडून आणि विशेषतः पुणे, मुंबईकडे वैदर्भीय मराठी बोलीची टिंगल केली जाते. मात्र, आता टीव्ही मालिकांमध्ये टीआरपी वाढविण्यासाठी वैदर्भी बोलीचा वापर वाढत आहे. वैदर्भी, वऱ्हाडी बोली बोलणारी पात्रे मालिकांमध्ये येत आहेत. मात्र, ज्या बोलीची टिंगल करण्यात येते ती बोलणाऱ्यांनीच मराठी भाषेच्या व्याकरणाचे नियम तयार केले आहेत, ही बाब आज अनेकांना माहीत नाही.
स्वातंत्र्यानंतर 1960 मध्ये मराठी भाषिकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थापना झाली. यानंतर मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने 1962 साली मान्यता दिली. तर 1972 साली यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. तेव्हापासून व्याकरणाच्या अठरा नियमांना मराठी भाषेचा आधार मानण्यात येतो. ही नियमावली वैदर्भीयांनी आणि नागपूर ही मध्यप्रांताची राजधानी असताना विदर्भ मराठी साहित्य संघाने तयार केली आहे. पुढे नागपूर महाराष्ट्रात विलीन झाले अन्‌ हीच व्याकरणाची नियमावली मराठी साहित्य महामंडळाला देण्यात आली. ज्या नियमावलीवर नंतर शासनाने मान्यतेची मोहोर उठविली.
या नियमावलीत शीर्षबिंदू कसा व कुठे वापरावा, अनुस्वाराचे नियम, अनेकवचनी नामांचे व सर्वनामांचे प्रकार, अ-कारान्त, इ-कारान्त व उ-कारान्त शब्द प्रयोगांचे नियम, ऱ्हस्व दीर्घाचे नियम आहेत. एवढेच नव्हे तर भाषेतील ध्वनीचिन्हे व त्यांचे नियम भाषा व्याकरणाच्या नियमावलीत निश्‍चित करण्यात आले आहेत. भाषेची लय, ताल, तोल, उच्चारण, स्वर यांचाही नियमावलीत समावेश आहे. प्रांत बदलतो तशी बोलीभाषा बदलते. मात्र, महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या कल्पनेला एकात्मिक स्वरूप प्राप्त व्हावे ही नियमावली ठरविण्यामागची भावना आहे. याच नियमांमुळे आज अर्थाची कल्पना, सृजनशीलता आणि संवादाची वृत्ती बहरते आहे.
देशात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप मराठीच्या अभ्यासक्रमात भाषाविज्ञान नव्हे तर साहित्यशास्त्र शिकवण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वेगळीच समजूत निर्माण झाली आहे. विद्यार्थी साहित्यालाच भाषा समजत असल्याचे सध्याचे वास्तव आहे. दुसरीकडे मराठी भाषा इंग्रजीकरणाच्या गर्तेत अडकू पाहत आहे.
विदर्भ साहित्य संघाने मराठी भाषेचे प्रमाण सांगितले. या नियमांप्रमाणेच बहुतांश ठिकाणी मराठी लिहिली जाते. माध्यमांत उपयोगात येणाऱ्या मराठीत चुका आढळतात. तरीही वैदर्भीय भाषेचा त्यात वापर वाढतो आहे ही बाब स्वागतार्ह आहे.
- श्रीपाद भालचंद्र जोशी
माजी अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य महामंडळ.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grammar rules are the gift of the vidarbha