
Nagpur News: सिर्फ बॉटल उठानेवालाही आता है यहाँ!
अखिलेश गणवीर
गिरीपेठ : ‘सिर्फ एक आदमी आता है जी यहाँ बॉटल उठानेवाला. और कोई नही आता’, ही व्यथा मांडली गिरीपेठच्या नागरिकांनी. येथे मोकळे मैदान आहे. लाखो रुपये खर्च करून ग्रीन जीम तयार करण्यात आली; मात्र याचा काहीही उपयोग स्थानिकांना होत नाही. मैदान ‘डम्पिंग यार्ड’मध्ये रूपांतरित झाले तर सभागृह रात्रीच्या वेळी दारूचा अड्डा बनते.
महानगरपालिकेचा धरमपेठ झोन शहरातील अतिशय चकाचक आणि स्वच्छ समजला जातो. धरमपेठ झोनचे रस्त्यावर दिसणारे चित्र चकाचक असले तरी वस्तीतील अंतर्गत वास्तविकता वेगळीच आहे. बऱ्याच वस्त्यांमध्ये अजूनही गटार, कचरा, घाण अशा विविध समस्या आहेत. गिरीपेठ भागातील नागरिक अशाच काही समस्यांनी त्रस्त आहेत.
गिरीपेठच्या आत शिरल्यावर भला मोठा नाला वाहतो. नाल्याची साफसफाई होत नाही. त्यात घाण, कचरा साचला आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रासले आहेत. नाल्याच्या काठावर राहणाऱ्यांना बाराही महिने त्रास सहन करावा लागतो. नाल्याच्या काठावर घर बांधणे हा आपला नाइलाज समजावा का? असा सवाल नागरिकांनी केला.
नाल्याला लागून महानगरपालिकेचे मोठे मैदान आहे. मनपाने येथे सभागृह बांधले; मात्र या सभागृहाचा उपयोग स्थानिकांना होत नाही. असामाजिक तत्त्वाच्या लोकांनी येथे दारूचा अड्डा बनविला. रोज रात्री येथे दारू पितात आणि जोरजोराने ओरडतात.
हटकले तर भांडणे होतात. अशा प्रवृत्तीच्या लोकांसोबत वाद घालू शकत नाही. रात्रीला कुटुंबासह येथे फिरू शकत नाही, अशी खंत स्थानिक नागरिक श्रीकांत जरिया, चेतन वानखेडे, प्रवीण वलके, दीपक जरिया आणि पापा राणे यांनी बोलून दाखविली. पोलिसांनी रोज रात्री येथे गस्त घालावी आणि आवश्यक सर्व सुविधा येथे द्याव्या, अशी स्थानिकांची मागणी आहे.
ग्रीन जीमचा खर्च पाण्यात
महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च करून येथे ग्रीन जीम बनविली. त्याला तारेचे कुंपण घातले. पेव्हर ब्लॉक व सिमेंट क्राँक्रीटने जीम चांगली तयार केली. मात्र, येथे साफसफाई होत नाही. चोहीकडे गवत आणि कचरा पडलेला आहे. ग्रीन जीमच्या मोकळ्या मैदानाला कचराघराचे स्वरूप आले आहे.
बहुतांश लोक याला ‘डम्पिंग यार्ड’ संबोधतात. कुत्रे, गायी, डुकरे, कचरागाड्या आणि संपूर्ण मैदानावर पसरलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांना सकाळी व संध्याकाळी ग्रीन जिममध्ये व्यायाम करण्याची इच्छा असूनही दूषित वातावरणामुळे नागरिक येथे जात नाही. ‘वातावरणही ऐसा गंदा रहता हैं की, क्या जीम करेंगे’ अशी खंत श्रीकांत जरिया व चेतन वानखेडे यांनी व्यक्त केली.
मोकळ्या मैदानाचा चांगला उपयोग व्हावा
गिरीपेठ परिसरात मोठी जागा मनपाची आहे. बाजूच्या वस्त्यांमध्ये व्हॉलिबॉल, टेनिस स्केटिंग ग्राउंड आहे. मात्र, येथे एवढी मोठी जागा असूनही दुर्लक्षित आहे. त्याचा उपयोग महिला, मुले, वृद्ध व पुरुषांना काहीच होत नाही.
येथील मनपा सभागृहाचे पुन्हा सुशोभीकरण करावे, जेणेकरून कार्यक्रम घेता येईल. त्याठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा. तसेच मोकळ्या मैदानाचे सौंदर्यीकरण करून किमान मुलांच्या खेळांसाठी तरी याचा उपयोग व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी त्यांनी मनपा प्रशासन व नगरसेवकांवर रोष व्यक्त केला.