भूजल पातळी वाढली रे भाऊ ! 

विरेंद्रसिंह राजपूत 
शनिवार, 7 डिसेंबर 2019

परतीच्या पावसामुळे भूजल पातळीला चालना मिळाली  असून 167 विहिरींचे केले निरिक्षणानंतर आकडेवारी समोर आली आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) : गेल्या काही वर्षापासून भूजल पातळीतील घट गंभीर वळणावर पोहोचली असतांनाच या वर्षीच्या परतीच्या पावसामुळे जमिनीतील भूजल पातळी काहीअंशी वाढल्याचे भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेने नुकत्याच जिल्ह्यातील घेतलेल्या वेगवेगळ्या 167 विहिरीच्या निरीक्षणावरून मागील 5 वर्षाच्या सरासरीमध्ये भूजल पातळीत 6.16 मीटर असलेली पातळी सप्टेंबर 19 मध्ये 4.77 मीटर इतकी निरीक्षणाअंती आढळून आल्याने त्यात 1.39 मीटरची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी पाच वर्षांच्या सरासरीत भूजल पातळीतील हीच घट 1.61 मीटरने खोल गेल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले होते. हे विशेष.

गेल्या चारपाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थितीमुळे भूजल पातळीत मोठी घट झाल्याचेच निदर्शनास आले आहे.   मात्र, यावर्षीच्या पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी चांगली झाल्यासोबतच परतीच्या पावसानेही दमदार बॅटिंग केल्याने भूजल पातळी वाढल्याचे निदर्शनास आल्याने आगामी काळात पाणीटंचाईला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
 भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा बुलडाणा यांचेमार्फत सप्टेंबर 19 मध्ये जिल्ह्यातील घेण्यात आलेल्या 167 विहिरीच्या निरीक्षणावरून भूजल पातळीत 1.39 मीटरची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
 जिल्ह्यात सर्वाधिक भूजल पातळी संग्रामपूर तालुक्यात 7.60 मीटरने वाढल्याचे दिसून आले असले तरी देऊळगावराजा, लोणार व सिंदखेडराजा तालुक्यात ऐवढा पाऊस होऊनही भूजल पातळी घटल्याचे निदर्शनास आले आहे.

जमिनीतील पाणी जपून वापरणे गरजेचे
यावर्षी पावसाळ्यासोबतच परतीच्या पावसाने दमदार एंट्री केल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे. तरी प्रत्येक वेळेस असाच पावसाळा होईल याची शास्वती नसल्याने जमिनीतील पाणी जपून वापरणे अधिक गरजेचे असणार आहे.
-रामकृष्ण पाटील, जलतज्ञ, नांदुरा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Groundwater levels increased