बच्चू कडू इन ‘ॲक्शन’; अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी (डीएसओ) आसाराम जाधव यांना एक महिन्याच्या सक्त रजेवर जाण्याचे आदेश दिले. पातूर पाणीपुरवठा योजनेच्या कामांत दिरंगाई केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांच्या शिस्तभंगाची कारवाई करण्याचे, पातूर येथील पाणी पुरवठ्याचे काम सन् २०१५ पासून पूर्ण न केल्यामुळे कंत्राटदाराचे डिपॉझिट जप्त करण्याचे व शिवाजी पार्क ते अकोट फाईल मार्गाचे काम सुरूच न केल्यामुळे कंत्राटदाराला दंड लावून त्याचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले. एकाच बैठकीत पाच वेगवेगळ्या प्रकरणात कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईचा पंच मारून पालकमंत्र्यांनी त्यांची चुणूक दाखवून दिली. 

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी (डीएसओ) आसाराम जाधव यांना एक महिन्याच्या सक्त रजेवर जाण्याचे आदेश दिले.

पातूर पाणीपुरवठा योजनेच्या कामांत दिरंगाई केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांच्या शिस्तभंगाची कारवाई करण्याचे, पातूर येथील पाणी पुरवठ्याचे काम सन् २०१५ पासून पूर्ण न केल्यामुळे कंत्राटदाराचे डिपॉझिट जप्त करण्याचे व शिवाजी पार्क ते अकोट फाईल मार्गाचे काम सुरूच न केल्यामुळे कंत्राटदाराला दंड लावून त्याचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले. एकाच बैठकीत पाच वेगवेगळ्या प्रकरणात कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईचा पंच मारून पालकमंत्र्यांनी त्यांची चुणूक दाखवून दिली. 

अधिकाऱ्यांना भरली धडकी
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवारी (ता. 25) दुपारी नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीची अध्यक्षता जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केली. यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरिया, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

खर्चाचा घेतला आढावा
सभेत जिल्हा वार्षिक योजनेचा 2020-21 चा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. त्यासोबतच सन् 2019-20 च्या वार्षिक योजनेच्या खर्चाचा आढावा सुद्धा घेण्यात आला. सभेत पालकमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक शैलीत कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अधिकाऱ्यांसह इतरांनी पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीची धास्ती घेतली. 

पालकमंत्र्यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय

 • जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला वितरीत करण्यात आलेल्या निधी खर्चाची गती मंद असल्याच्या कारणासह कार्यालयात येणाऱ्यांना कविता ऐकवण्याच्या प्रकरणासह उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांच्या चौकशीत 75 टक्के दोष कार्यक्षमतेमध्ये असल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले.
   
 • बैठकीत पूर्व परवानगी न घेता अनुपस्थित राहणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्र्यांनी दिले. 
   
 • पातूर पाणीपुरवठा योजनेचे काम सन् 2015 पासून पूर्ण न केल्याचा मुद्दा आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केल्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित कंत्राटदाराचे डिपॉझिट जप्त करण्याचे व आठ दिवसात कामात सुधारणा न केल्यास कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्याचे सांगितले. सदर काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या कामाची निविदा पुन्हा काढण्याची तयारी करण्याचे व संबंधित कंत्राटदाराची अनामत रक्कम जब्त करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्र्यांनी दिले. 
   
 • बार्शीटाकळी शहरापासून 3 ते 5 किलोमीटर दूर असणाऱ्या क्रीडासंकुलाचे उद्‍घाटन एक वर्षापूर्वी झाल्यानंतर सुद्धा अद्याप काम सुरू न झाल्याचा मुद्दा आमदार हरिष पिंपळे यांनी उपस्थित केला. त्यावर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी सुद्धा आक्षेप घेतल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरीक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर व अधिकारी देशपांडे यांची समिती गठित करण्याचे आदेश पालमंत्र्यांनी दिले. 
   
 • शिवाजी पार्क ते अकोट फाईल रोडचे काम कंत्राटदाराने अद्याप पूर्ण न करता तीन महिने काम बंद ठेवल्याचा मुद्दा आमदार गोवर्धन शर्मा यांनी उपस्थित केला. त्यामुळे कंत्राटदाराला दंड ठोठावण्याचे व कंत्राटदाराचा परवाना (लायसन्स) निलंबित करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. त्यावर सार्वजिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जोशी यांनी दोन दिवसांत कंत्राटदाराला काम सुरू करणास लावतो, असे सांगून प्रकरणात सावरा-सावर करण्याचा प्रयत्न केला. 
   
 • नगर पालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत जॉब कार्ड देण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आठ दिवसांत जॉब कार्ड देण्याचे आदेश सुद्धा शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guardian minister bacchu kadu take action against contractor in akola