शेतकऱ्यांच्या हितासाठी धावले पालकमंत्री; घेतला खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा

गोंदिया : खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभेत बोलताना पालकमंत्री अनिल देशमुख.
गोंदिया : खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभेत बोलताना पालकमंत्री अनिल देशमुख.

गोंदिया : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, कृषी विभागाने नियोजन करून शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करावी, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतेच दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी (ता. 25) जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व तयारीची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहण घुगे, जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभापती शैलजा सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, कृषी विभागाने समन्वय साधून रासायनिक खते, बी-बियाणे, शेतीशी संबंधित अवजारे, फवारणी यंत्रे व कीटकनाशके आदी बाबींची शेतकऱ्यांना उपलब्धता करून देताना पीकविमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा सहज आणि सुलभ पद्धतीने कसा काढता येईल, यादृष्टीने नियोजन करावे. पारंपरिक पिकांसोबतच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास प्रोत्साहित करावे.

उत्सुक शेतकऱ्यांसाठी या योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत बागायती पिकांमध्ये उत्सुक असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी करून घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर भर द्यावा, असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन प्रलंबित असतील, त्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज कनेक्‍शन द्यावे, सामान्य शेतकऱ्यांना बॅंकांनी पीक कर्ज वाटप करावे, अशा शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात बॅंकेचे अधिकारी टाळाटाळ करीत असतील; तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. खरीप हंगाम सन 2020-21 करिता जे नियोजन केले आहे, त्याची कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सभेत अधिकाऱ्यांनीही मांडले मत

या सभेला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, कृषी विकास अधिकारी मनोहर मुंडे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एस. पी. वाघमारे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सोनुले, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक उदय खर्डेनवीस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी भाऊसाहेब खर्चे, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सांभरे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भात पिकासाठी यंदा 1 लाख 89 हजार हेक्‍टर क्षेत्र

जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार 864 हेक्‍टर क्षेत्रावर पिके घेण्याचे नियोजन आहे. भात पीक 1 लाख 89 हजार हेक्‍टर क्षेत्रावर घेण्याचे प्रस्तावित आहे. महाबीज आणि खासगी कंपन्यांकडून भाताच्या 68 हजार 988 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. युरिया, डीएपी, संयुक्त खते यासह अन्य रासायनिक खते यांची 83 हजार 57 मेट्रिक टन इतकी मागणी केली आहे. 2020-21 या वर्षात 270 कोटी रुपये खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, ग्रामीण बॅंक, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांकडून प्रस्तावित आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com