किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे अर्धे पीक गेले...उरल्या सुरल्या पिकाचे भावही वाढले, मात्र याचा फायदा कोणाला?

मनोज रायपुरे
Saturday, 5 September 2020

शेतकरी शेतात राबराब राबतो. कष्टाने फुलवलेल्या शेतातून चांगले उत्पादन मिळावे, अशी त्यांना आशा असते. मात्र यंदा सोयाबीन पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या आशा पार मावळल्या आहेत. हातचे ५० टक्के पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठ दिवसांत सोयाबीनच्या भावातही वाढ झाली असली; तरी त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच मिळणार आहे.

वर्धा : जिल्ह्यात सोयाबीन पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. जवळपास सोयाबीनचे ५० टक्‍के पीक गेल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. गत आठ दिवसांत सोयाबीनच्या भावात प्रतिक्‍विंटल ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र याचा फायदा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच झाला आहे. नवीन सोयाबीन निघताच यंदा चार हजार दोनशे रुपये भाव राहतील, असे व्यापारी बोलत आहेत.

सोयाबीनचे भाव वाढताच खाद्य तेलाच्या भावातही मोठी वाढ झाली असून सोयाबीनच्या तेलाने प्रतिकिलो शंभरी पार केली आहे.

ऑक्‍टोबर २०१९ मध्ये नवीन सोयाबीनला २५०० रुपयांपासून ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. हा भाव जुलै महिन्यानंतर स्थिर होता. त्यामुळे सोयाबीनच्या तेलातसुद्धा फारशी वाढ झाली नाही. मात्र, ऑगस्ट महिन्यात सोयाबीन पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले. त्यामुळे सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही. सोयाबीन साथ देणार नसल्याने शेतकरी सोयाबीनच्या पिकात रोटावेटर फिरवीत आहेत. याचा परिणाम थेट बाजारपेठेवर झाला आहे. सोयाबीनच्या दरात प्रतिक्‍विंटल चारशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली आहे.

साठवणूक करणाऱ्यांनाच फायदा

हिंगणघाट बाजार समितीमध्ये दररोज ८०० ते ९०० रुपये क्‍विंटल सोयाबीनची आवक होत आहे. प्रतिक्‍विंटल ३ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. या भाववाढीचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करून ठेवली होती त्यांना आणि व्यापाऱ्यांनाच झाला आहे. सोयाबीनच्या तेलाने शंभरी पार केली आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचे तेल प्रतिकिलो १०५ रुपये आहे. कोरोना विषाणूमुळे आधीच गोरगरिबांचा रोजगार गेला आहे. त्यातच जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावातही सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, गोरगरिबांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे.

जाणून घ्या :  आश्चर्य !  सातबारावर बॅंकांचा विश्‍वास नाही; शेतीच्या नकाशात अडकले पीककर्ज

सोयाबीनचे तेल शंभरी पार

सोयाबीनचे भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम खाद्य तेलावर झाला आहे. किरकोळ बाजारात सोयाबीनचे तेल प्रतिकिलो १०० रुपये आहे. यासह इतर तेलांचे भावसुद्धा वाढले आहेत. येत्या काही दिवसांत सोयाबीन तेलाचे भाव पुन्हा वाढतील, असे व्यापारी बोलत आहेत.

किडीच्या आक्रमणात अर्धे पीक उद्ध्वस्त
सोयाबीन पिकावर किडीने आक्रमण केल्याने ५० टक्‍के पीक उद्‌ध्वस्त झाले आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी होणार आहे. उत्पादन कमी आणि मागणी अधिक राहिल्याने सोयाबीनचे भाव वाढणार आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्‍विंटल ३ हजार ९०० रुपये भाव मिळत आहे. नवीन सोयाबीनला सुरुवातीलाच ४ हजार २०० रुपये प्रतिक्‍विंटल भाव मिळण्याची शक्‍यता आहे.
- सुरेश चोपडा
व्यापारी, हिंगणघाट.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: half soybean crop damage Due to the infestation of insects