प्राणहिता नदीच्या काठावरील कुंकुमेश्‍वर मंदिर पाहिलेत का?...पर्यटनस्थळाचा मिळावा दर्जा

तिरुपती चिट्याला
Monday, 3 August 2020

कुंकुमेश्‍वर हे ठिकाण सिरोंचा तालुकास्थळापासून 35 ते 40 किमी अंतरावर उत्तर दिशेकडे तर टेकडा या गावापासून 3 किमी अंतरावर उत्तर-पश्‍चिम दिशेकडे एका उंच पहाडावर व प्राणहिता नदीच्या काठावर आहे. येथे भगवान शिवशंकराची कुंकुमेश्‍वर रूपात मनोभावे पूजा केली जाते.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यात अनेक प्राचीन तीर्थस्थळे असली; तरी एक आडवळणावरचे आणि गर्द हिरव्या रानाच्या कुशीत वसलेले तीर्थस्थळ आहे. येथे येताच निसर्गसौंदर्य बघून आपण मंत्रमुग्ध होतो. हे आहे उंच पहाडावर प्राणहिता नदीच्या काठावर वसलेले कुंकुमेश्‍वर मंदिर. येथे भगवान शिवशंकराची कुंकुमेश्‍वर रूपात मनोभावे पूजा केली जाते. दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे गर्दी होत असते.

कुंकुमेश्‍वर हे ठिकाण सिरोंचा तालुकास्थळापासून 35 ते 40 किमी अंतरावर उत्तर दिशेकडे तर टेकडा या गावापासून 3 किमी अंतरावर उत्तर-पश्‍चिम दिशेकडे एका उंच पहाडावर व प्राणहिता नदीच्या काठावर आहे. निसर्गाने नटलेले हे स्थळ येथे मिळणाऱ्या चवदार झिंग्यांसाठीही प्रसिद्ध आहे.

येथील पहाडावर 15 ते 20 फूट लांबी व रुंदीची एक नैसर्गिक गुहा तयार झाली आहे. या गुहेत जुन्या काळातील मूर्ती आढळून येतात. यात कोरीव शिवलिंग, नंदी, कुंकुमेश्‍वराची कोरीव मूर्ती तसेच काही कोरीव स्तंभसुद्धा आहेत. त्यामुळे या स्थळाला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाभारतकालीन आख्यायिका

दरवर्षी येथे महाशिवरात्रीला यात्रा भरत असते. या यात्रेत परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात व पूजाअर्चा करीत असतात. या स्थळाबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हे स्थळ महाभारतकालीन असण्याचे सांगितले जाते. महाभारत काळात दौपदीने आपल्या कपाळावर कुंकू म्हणून येथील लाल मातीचा वापर केला. तेव्हापासून या स्थळाला कुंकुमेश्‍वर नाव पडले, असे नागरिक सांगतात.

पायऱ्यांची व्यवस्था नाही

हे स्थळ अतिशय दुर्गम व दुर्मिळ आहे. याठिकाणी जायला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. गुहेपर्यंत जाताना कोणत्याही प्रकारच्या पायऱ्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या कमीच असते. या स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

जाणून घ्या : अधिकाऱ्यांनो विकासाच्या कामात आडवे येऊ नका.. अन्यथा गय करणार नाही; कोणी दिली तंबी.. वाचा सविस्तर

अशी पूर्ण होते मनोकामना

अनेक मंदिरांमध्ये भक्त देवापुढे नवस बोलतात, कौल मागतात, मनोकामना सांगतात. प्रत्येक मंदिरात ही पद्धत वेगळी असते. कुंकुमेश्‍वरमध्ये ही पद्धत अतिशय वेगळी आणि गमतिशीर आहे. कुणाला कुंकुमेश्‍वराला काही मागायचे असल्यास आपले दोन्ही कान दोन्ही हातांनी धरून हाताच्या कोपराने शिवलिंग उचलून इच्छा व्यक्त करावी लागते. अशा प्रकारे मागणे मागल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी मान्यता आहे.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you seen the Kunkumeshwar temple on the banks of the river Pranhita?