गोंडकालीन साम्राज्याचा "माणिक' पाहिलात काय?... वाचा मग सविस्तर

सिद्धार्थ गोसावी
Thursday, 30 July 2020

पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून भग्न अवस्थेत पडलेल्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. तटबंदीची पुनर्बांधणी करण्यात आली. टहाळकी बुरुज, पर्यटकांना बसण्यासाठी नवीन बुरुज, आतील व बाहेरील भागातील रंगरंगोटी, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी लोखंडी कटघरे बांधण्यात आली. त्यामुळे माणिकगड किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे.

कोरपना (जि. चंद्रपूर) : माणिकगड किल्ला समुद्र सपाटीपासून 507 मीटर उंचावर बांधण्यात आला. तो तीस हेक्‍टरवर वसलेला आहे. किल्ला राजुरा, कोरपना आणि आता जिवती तालुक्‍यात समाविष्ट करण्यात आला आहे. नागवंशीय राजा महिन्दु योन यांनी माणिकगड किल्ला नव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे. यांचे राज्य 9 ते 12 शतकापर्यंत टिकले.

पुढे हा प्रदेश गोंडराज्याच्या आधिपत्याखाली आला. या मानावंशीय नाग राजाची अग्रदेवता माणिक्‍य देवी आहे. हिच्या नावावरूनच या किल्ल्याला माणिकगड नाव दिले असावे. पुढे माणिक्‍यगडाचे अपभ्रंश होऊन माणिकगड झाले.

या किल्ल्यावर गडाचे दरवाजे, त्यावरील नागाचे तसेच व्याळाची शिल्पे, तोफ, तटबंदी, बुरुज, टहाळकी बुरुज, बुरुजावरील मूर्ती, तळघर, पाताळ विहीर, राणी महल, राणी तलाव आदी या किल्ल्यावर बघायला मिळते. सोबतच जैवविविधतेने नटलेली विपुल वनसंपदा येथे आहे.

 

सौंदर्य पालटले

पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून भग्न अवस्थेत पडलेल्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. तटबंदीची पुनर्बांधणी करण्यात आली. टहाळकी बुरुज, पर्यटकांना बसण्यासाठी नवीन बुरुज, आतील व बाहेरील भागातील रंगरंगोटी, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी लोखंडी कटघरे बांधण्यात आली. त्यामुळे माणिकगड किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. त्याच्या सौंदर्यातही आमूलाग्र बदल झाला आहे.

हेही वाचा : कुपोषण मुक्तीची 'आशा'! 54 कुपोषित बालकांना मिळणार मायेचा आधार..कसा ते वाचा..

पहाडांनी व्यापलेले माणिकगड

वनविभागाचे या ठिकाणी कार्यालय उघडण्यात आले. हे कार्यालय वनसंरक्षक समिती पाहात असते. माणिकगड किल्ला पाहण्यासाठी तिकीट काढूनच किल्ल्याची सैर करावी लागते. चंद्रपूरपासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरामार्गे गडचांदूर त्यानंतर गडचांदूर-जिवती मार्गावरून अवघ्या बारा किमी अंतरावर माणिकगड किल्ला आहे. या मार्गाने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वनराजी आहे. पहाडांनी व्यापलेले अमलनाला धरण दृष्टीस पडते. नागमोडी रस्ते पार करीत माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. या पायथ्याच्या डाव्या बाजूला हेमाडपंती विष्णू मंदिर आहे. हेसुद्धा मंदिर पाहण्यासारखे आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you seen the "ruby" of the Gond Empire?