वरिष्ठांची भूमिका संशयास्पद
हवाला प्रकरण : तिघे बळीचा बकरा; काहींना अभय
नागपूर - हवाला व्यवसायातील साडेपाच कोटी रुपयांवर पोलिसांनीच दरोडा घातल्यामुळे नागपूर पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली. ही प्रतिमा सुधारण्यासाठी केवळ तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात नंदनवन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर शहरात चर्चेला ऊत आला आहे. कोट्यवधींची हवाल्याची रक्कम पकडल्याची माहिती ‘थ्री स्टार’ अधिकाऱ्यांना दिली होती, असा नवा खुलासा समोर आल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.

सहायक पोलिस निरीक्षक सुनील सोनवणे आणि पोलिस कर्मचारी विलास भाऊराव वाडेकर (३९, रा. सुरेंद्रगढ) आणि सचिन शिवकरण भुजभुजे (३५, रा. महाविष्णूनगर) यांना खबऱ्यांनी कोट्यवधीची हवालाची रक्कम पोहचत असल्याची माहिती दिली होती. तिघांनीही कार जप्त केली आणि लगेच अर्धीअधिक रक्कम लुटण्याची योजना आखली. पोलिसांनी रवी रमेश माचेवार (३५, रा. नंदनवन झोपडपट्टी), सचिन नारायण पडगीलवार (३७), गजानन भोलेनाथ मुंगणे (२७) आणि प्रकाश बबलू वासनिक (२२) यांची मदत घेऊन रकमेवर डल्ला मारला. एवढी मोठी रक्कम पचवणे अवघड असल्याचे एपीआय सोनवणे याला माहिती होते. त्यामुळे त्याने एका ‘थ्री स्टार’ला माहिती दिली. पोलिस ठाण्याच्या बाहेर कट शिजला. कटाप्रमाणे चारही आरोपी रक्कम घेऊन चिमूर तालुक्यातील भीसी गावला गेले. कारवाई केल्याचा तोरा मिरविण्यासाठी नंदनवन पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. मात्र, चार ते पाच तासातच अडीच कोटींच्या रकमेवर पोलिसांनी डल्ला मारल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नंदनवन पोलिस निरीक्षकाने ‘कानावर हात’ ठेवत अफवा असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले होते. त्यानंतर मात्र, पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांनी तपासाची चक्रे फिरवताच तीन पोलिस कर्मचारी हवालाच्या लुटीत गुंतल्याची माहिती समोर आली होती. ही रक्कम मेपल ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे. या कंपनीचे संचालक मुंबई निवासी अली हुसेन जिवानी (३६) आहेत. त्यांनी सांगितले की एकूण रक्कम ५.७३ कोटी रुपयांची होती. जेव्हा की पोलिसांनी आपल्या कारवाईत ३.१८ कोटी रुपयेच दाखविले होते.
गुन्हे शाखेकडे जाणार तपास?
नंदनवनमधील हवाला रक्कम लुटीच्या प्रकरणाचा तपास सध्या अजनीचे ठाणेदार संखे करीत आहेत. मात्र, या तपासावर संशय निर्माण झाल्यामुळे तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नंदनवन ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.