त्यांनी ट्रॅक्‍टर चालवून भेंडीचे पीक केले नष्ट...उत्पादक शेतकऱ्याची व्यथा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

लॉकडाउन काळात पुरेसा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना भेंडीचा तोडा करून आणणे व बाजारात विक्रीसाठी नेणे परवडणारे नाही. उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा मजुरीचा खर्चच अधिक येतो. त्यामुळे इस्तारी कहालकर यांनी त्यांच्याकडील एक एकरातील भेंडीच्या उभ्या पिकावर शुक्रवारी ट्रॅक्‍टर चालवला.

धारगाव (जि. भंडारा) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने इतर मालासह भेंडीचे भाव गडगडले आहेत. अपेक्षित उत्पन्न व लाभ मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या भंडारा तालुक्‍यातील टेकेपार/माडगी येथील इस्तारी कहालकर या शेतकऱ्याला आपल्या शेतातील भेंडीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर फिरविण्याची वेळ आली आहे.

 

परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे पीक घेतात. अनेक शेतकऱ्यांनी भेंडी पिकाची लागवड केली आहे. परंतु, सध्या या पिकाला पुरेसा भाव नाही. मागील तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदच आहेत; तर विभागणी करून रोजचा बाजार भरविला जातो. परंतु, पाहिजे तसा खप नाही. याचा परिणाम शेतमालावर झाल्याचे दिसते.

 

लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात शेतीतून निघणारा माल विकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. परंतु, जीवनावश्‍यक घटकांत समावेश असल्याने कृषी क्षेत्र यातून वगळण्यात आले. स्थानिक शेतीमधून येणाऱ्या भाजीपाल्याशिवाय बाहेरूनही आवक वाढली आहे. शेती उत्पादित मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हताश झाला आहे.

भेंडीचा मजुरीचा खर्चही निघत नाही

टेकेपार/माडगी शिवारात मोठ्या प्रमाणात भेंडीची लागवड झालेली आहे. लॉकडाउन काळात पुरेसा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना भेंडीचा तोडा करून आणणे व बाजारात विक्रीसाठी नेणे परवडणारे नाही. उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा मजुरीचा खर्चच अधिक येतो. त्यामुळे इस्तारी कहालकर यांनी त्यांच्याकडील एक एकरातील भेंडीच्या उभ्या पिकावर शुक्रवारी ट्रॅक्‍टर चालवला.

खर्च निघत नसेल तर पीक ठेवून काय फायदा

याबाबत शेतकरी कहालकर यांनी सांगितले की, केलेला खर्च निघत नसेल तर ते पीक ठेवून काय उपयोग? या खरीप हंगामात त्यांनी या पिकाच्या जागी धानाचे पीक घेण्याचे ठरवले आहे. अपेक्षित उत्पन्न व योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर फिरवल्याचे सांगितले. परिसरातील इतर शेतकरीसुद्धा असाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

जाणून घ्या : भंडारा जिल्ह्यातील नंदा, कान्हा गवळी मंदिर आणि त्याची परंपरा

चांगल्या उत्पादनाला भाव मिळत नाही
एक एकर शेतात भेंडीची लागवड केली होती. त्यासाठी चांगली फवारणी आणि मशागतीसाठी हजारो रुपये खर्चसुद्धा केले. चांगले उत्पादन हाती येऊनही पाहिजे तसा भाव मिळाला नाही. सध्या आठवडी बाजारही बंद आहेत. तोडणीसाठी मजुरी देणेही परवडत नाही. आता त्याऐवजी धानाचे पीक घेणार आहे.
- इस्तारी कहालकर, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He drove a tractor and destroyed the okra crop