त्याचा राग झाला अनावर आणि जाळले स्वतःचेच घर... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

स्वतःच स्वतःच्या घराला आग लावण्यामागील घटनाक्रम असा की, रामाटोला येथील धनलाल रहांगडाले यांना व्यंकट रहांगडाले नामक मुलगा आहे. डोक्‍याने तापट असलेल्या या व्यंकटचे बुधवारी, 17 जूनच्या रात्री घरातील सदस्यांसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले.

गोरेगाव (जि. गोंदिया)  : कोणी स्वतःच स्वतःच्या घराला आग लावील काय, असा प्रश्‍न केल्यास नक्कीच त्याचे उत्तर नाही असेच येणार. मात्र, या प्रश्‍नाचे होकारार्थी उत्तर देणारी घटना गुरुवारी, 18 जून रोजी गोंदिया जिल्ह्यातील रामाटोला (मलपुरी) या गावात घडली आहे. कौटुंबिक कलहातून एका व्यक्तीने स्वतःचेच घर जाळल्याचे समोर आले आहे. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. 

स्वतःच स्वतःच्या घराला आग लावण्यामागील घटनाक्रम असा की, रामाटोला येथील धनलाल रहांगडाले यांना व्यंकट रहांगडाले नामक मुलगा आहे. डोक्‍याने तापट असलेल्या या व्यंकटचे बुधवारी, 17 जूनच्या रात्री घरातील सदस्यांसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. त्यामुळे व्यंकटचे वडील धनलाल रहांगडाले, लहान भाऊ व अन्य सदस्य घराबाहेर पडून बाहेरगावी निघून गेले. या प्रकारामुळे व्यंकट आणखीच चिडला. त्याचा राग अनावर झाला. आपला राग कोणावर काढावा त्याला काही केल्या कळेना. अखेर डोक्‍यात राग भिनलेल्या व्यंकटने घरी कोणीही नसल्याचे पाहून आपल्याच घराला आग लावून दिली. 

अवश्य वाचा- लग्नाचे आमीष दाखवून केले शोषण, परंतु ऐनवेळी घेतली ही भूमिका

घरातील अन्नधान्य, साहित्य जळून खाक

उल्लेखनीय म्हणजे, व्यंकटने आपल्याच घराला आग तर लावली, मात्र स्वयंपाक घरात असलेल्या गॅस सिलींडरचा स्फोट होऊ नये म्हणून की काय, घराला आग लावण्यापूर्वी त्याने स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडर घराबाहेर काढून ठेवले आणि नंतर घराला आग लावली. या आगीत घरातील अन्नधान्य, रोख रक्कम, फर्निचर, कपडे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू यांसह अन्य साहित्य घरासह जळून खाक झाले. आपले राहते घर आपल्याच पोराने जाळले हे जेव्हा वडील धनलाल रहांगडाले यांच्यासह घरातील इतर सदस्यांना कळले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी थेट पोलिस ठाण्याचा रस्ता धरून आपल्याच पोराने आपले घर जाळल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He got angry and set fire to his own house