‘त्याने‘ धानावर फवारले तणनाशक अन् बाधा झाली कापसाला… तालुका कृषी तक्रार निवारण समितीने शेतात केली पाहणी

जितेंद्र सहारे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शेतात कोणतेही पीक घेतल्यावर त्यात तण वाढत असते. हे तण पिकांच्या वाढीसाठी घातक असते. त्यामुळे त्याचे निंदण करणे गरजेचे असले; तरी ते परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी शेतात तणनाशक औषधांची फवारणी करतात; मात्र या तणनाशक फवारणीमुळे पिकांनाच धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतात तणनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे.

चिमूर (जि. चंद्रपूर) : शेतात वाढलेले तण काढण्याकरिता मजुरी परवडत नसल्याने अलीकडे अनेक शेतकरी तणनाशकाचा वापर करतात. चिमूर तालुक्‍यातील भिलगाव (रिठ) येथील शेतकरी संजय कामडी यांनी स्वतःच्या धान पिकावर जहाल तणनाशकाची फवारणी केली.

त्यामुळे लगतच्या शेतकरी राजू कामडी यांचे अडीच एकर, तर संभाजी भलमे यांच्या दीड एकरातील कापूस पिकाला बाधा झाली आहे. यामुळे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

चिमूर तालुक्‍यात यंदा धान क्षेत्रात घट होऊन कापसाचे क्षेत्र वाढले आहे. धानात येणारे तण नष्ट करण्याकरिता वापरले जाणारे तणनाशक जपून वापरले जातात. मात्र एक जहाल तणनाशक औषध आहे. हे औषध धानपिकांवर फवारल्यानंतर नजीकच्या जवळपास १ किलोमीटर क्षेत्रातील कापसाच्या पिकावर बाधा होऊन त्याचे पान चुरडा झाल्यागत गतप्राण होतात.

जहाल तणनाशक फवारल्याचा आरोप

यावर कोणतीही उपाययोजना केली तरी कापसाची वाढ , फूल, पाती व बोंडावर परिणाम होतो. त्याची माहिती शेतकरी, कृषी अधिकारी तथा कृषी केंद्रास आहे. असे असूनही संजय कामडी यांनी जाणीवपूर्वक या जहाल तणनाशक फवारल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. कापूस पिकावर बाधा झालेले शेतकरी राजू कामडी व संभाजी भलमे हे अल्पभूधारक आहेत. शेती उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण चालते. मात्र, तणनाशकाच्या फवारणीने त्यांना येणारे लाखो रुपयाचे कापूस पीक बाधित झाले आहे. दरम्यान, या पिकाला वाचविण्याकरिता बाधित शेतकरी संजीवनी ठरणाऱ्या औषधांची फवारणी करीत आहेत.

त्यामुळे तालुका कृषी तक्रार निवारण समितीने शेतात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी तथा चौकशी केली. पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील संशोधक डॉ. विनोद नागदेवते, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, तांत्रिक कृषी अधिकारी प्रकाश गोंधळी, कृषी सहायक पी. सदगर यांच्या समितीने संबंधित शेतकऱ्यांना बाधित कापूस पिकास पुनरुज्जीवित करण्याकरिता उपाययोजना सुचविल्या.

युरियाची १५ लिटरला १५० ग्रॅमची फवारणी करा
प्रथमदर्शनी धानावर तणनाशकाच्या फवारणीने कापूस पिकाला बाधा झाल्याचे दिसून आले. या बाधित रोपांना प्रथमतः पाण्याचे स्प्रे, बाधित पाने खुळणे, युरिया १५ लिटरला १५० ग्रॅम इत्यादींची फवारणी केल्यास ही रोपे पुनरुज्जीवित होऊ शकतात.
- डॉ. विनोद नागदेवते, संशोधक, पीकेव्ही, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही.

जाणून घ्या : अरे... हे काय राष्ट्रीय महामार्गात एक किमी रस्ताच नाही, वाचा सविस्तर...

टू फोर डी तणनाशक विक्री थांबवली
या प्रकरणाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून नेमके कोणते तणनाशक फवारण्यात आले. त्याची दाहकता किती आहे, याची चौकशी केली. चिमूर तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांनी टू फोर डी तणनाशक विक्री थांबवून इतर तणनाशक औषध योग्य प्रमाणात व योग्यप्रकारे वापरण्याच्या सूचना देऊन विकावे, असे पत्र दिले आहे.
- ज्ञानदेव तिखे, तालुका कृषी अधिकारी, चिमूर.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He sprayed herbicides on the paddy but the cotton was affected