स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका वाटून तो गावाकडे निघाला होता, तेव्हाच काळाने डाव साधला... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

शुक्रवारी, 20 मार्च रोजी तो नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी राजुरा आणि रामपूर येथे आला होता. पत्रिका देऊन झाल्यानंतर चार वाजताच्या सुमारास तो दुचाकीने गोवरी येथे परत जाण्यासाठी निघाला.

राजुरा (जि. चंद्रपूर) : काळ कधी आणि कुठे आडवा येईल काही सांगता येत नाही. आता हेच बघाना. एक तरुण स्वतःच्यालग्नाच्या पत्रिका वाटून गावाकडे दुचाकीने परत येत होता. त्याच वेळी मार्गात त्याच्याच गावातील त्याच्याच घराजवळ राहणाऱ्या दुसऱ्या युवकाच्या दुचाकीची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी होऊन दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अवश्य वाचा-  चोरट्यांनी तोडले चक्क न्यायालयाचे कुलूप

गोवरी येथे राहणाऱ्या संतोष रामकिशन लांडे (वय 27) या युवकाचे लग्न 12 एप्रिल रोजी ठरले होते. त्यामुळे संतोष नातेवाइकांना लग्नाच्या पत्रिका वाटण्यात व्यस्त होता. शुक्रवारी, 20 मार्च रोजी तो नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी राजुरा आणि रामपूर येथे आला होता. पत्रिका देऊन झाल्यानंतर चार वाजताच्या सुमारास तो दुचाकीने गोवरी येथे परत जाण्यासाठी निघाला. दरम्यान मार्गात वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता.

...आणि काळाने साधला डाव 

रामपूरवरून निघाल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माथरा वळणावर समोरून येणाऱ्या प्रीतम परसुडकर (वय 25) याची दुचाकी संतोषच्या गाडीवर जोरदार धडकली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. प्रीतम परसुटकर हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे संतोष आणि प्रीतम गोवरी येथील एकाच वार्डात शेजारी राहणारे रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. बोहल्यावर चढण्यापूर्वी संतोषवर काळाने दुर्दैवी घाला घातला. यामुळे लांडे परिवारावर दुःखाचे संकट कोसळले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He was coming back by Sharing his own wedding cards and accident happend