दुधातील फॅट उत्पादकांसाठी डोकेदुखी

रामेश्‍वर काकडे
सोमवार, 1 जुलै 2019

वर्धा ः सरकारकडून शेतीसाठी जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी ढिंडोरा पिटण्यात येतो. मात्र, दुधाची खरेदी करण्यासाठी फॅटच्या कमतरतेसह अनेक तांत्रिक बाबी अडसर ठरत आहेत. त्याचा परिणाम कमी दरात विक्री केल्याने पशूंच्या खाद्याचे पैसेही निघत नाहीत, त्यामुळे दूध उत्पादकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

वर्धा ः सरकारकडून शेतीसाठी जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी ढिंडोरा पिटण्यात येतो. मात्र, दुधाची खरेदी करण्यासाठी फॅटच्या कमतरतेसह अनेक तांत्रिक बाबी अडसर ठरत आहेत. त्याचा परिणाम कमी दरात विक्री केल्याने पशूंच्या खाद्याचे पैसेही निघत नाहीत, त्यामुळे दूध उत्पादकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
दूध व्यवसायाला चालना मिळावी, तसेच बेरोजगारांना त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून गायी, म्हशी या दुधाळ जनावरांचे तसेच शेळ्या, मेंढ्यांचे 50 टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते. याशिवाय अनेक अल्पभूधारक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाला पसंती देतात. परंतु त्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला शासनाचा ठरावीक दर मिळत नसल्याने त्यांनी गायी, म्हशीला खायला घातलेल्या खुराक व वैरणीचे पैसेही निघणे दुरापास्त झाले आहे. प्रतिलिटर 25 रुपये भाव दुधाला जाहीर केलेला आहे. मात्र, अनेक उत्पादकांना दुधातील फॅटच्या कमतरतेमुळे 17 ते 18 रुपयांत विक्री करण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील शासकीय दुग्ध शाळेमार्फत दिवसाकाठी 16 ते 17 हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. विविध संस्थांमार्फत 65 ते 67 हजार लिटर दूध उपलब्ध होते. प्रोसेसिंग व इतर कामांसाठी लागणारे मनुष्यबळ कमी असल्यामुळे शासकीय दुग्धशाळेत दिवसाकाठी 16 हजार लिटर दुधावर प्रक्रिया व पॅकेजिंग करता येते. जिल्हा दुग्ध सहकारी संस्थेकडून 11 हजार लिटर दुधाची खरेदी केली जाते, परंतु सध्या दुधाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सध्या सहा हजार लिटर दूध शासकीय दुग्धशाळेला पाठविले जाते. दुधातील लॅक्‍टोमीटरचे प्रमाण जास्त व फॅटचे कमी असल्याने उर्वरित दूध दिनशा या खासगी कंपनीला विक्री केले जाते. त्यांच्याकडून 17 ते 18 रुपये प्रतिलिटर भाव मिळतो, त्यामुळे उत्पादकांना प्रतिलिटरमागे सात ते आठ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

दुधातील फॅटची होते दोनवेळा तपासणी
वर्धा दूध उत्पादक संघ विविध दूध संकलन केंद्रातून फॅट तपासून दुधाची खरेदी करते. त्यात लॅक्‍टोमीटर 28 ते 29 घनता असते, मात्र, त्यानंतर सर्व दूध एकत्रित करून पुन्हा फॅटची तपासणी केली जाते. त्यामध्ये लॅक्‍टोमीटर कमी झाल्याने फॅटमध्ये तफावत आढळते. त्याचा परिणाम सर्व उत्पादकांना एकच दर आकारला जात असल्याने जास्त फॅट असलेल्या दुधालाही कमी भाव मिळतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Headaches for milk producers