प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

नगरसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांनी केली संयुक्त पाहणी
 

अकोला : महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना व आरोग्य सुविधांबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी संयुक्त पाहणी केली. या क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी नगरसेवकांनी कटक्षाने लक्ष देवून सर्व नागरिक तपासणी करून घेतील यासाठी प्रयत्न करण्याते आवाहनही अधिकाऱ्यांनी केले.

 

शहरातील बैदपुरा आणि अकोट फैल परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढल्याने दोन्ही क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहे. येथे महानगपालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करून कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्ण शोधण्यात येत आहे. याशिवाय येथील नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना केल्या जात आहे. या सर्व उपाययोजनांची पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केली. त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे हे उपस्थित होते.

 

मनपा दवाखान्यास भेट

अधिकाऱ्यांनी अकोट फैल येथील मनपा दवाखान्यास भेट देऊन पाहणी केली. माणीक टॉकीज परिसरातील बंदोबस्ताची पाहणी केली. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. घरी येणाऱ्या आरोग्य पथकांना तपासणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन केले. या भागातील नगरसेवकांनी आपल्या भागातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी झाली की नाही याबाबत कटाक्षाने दक्ष असावे, असे आवाहन त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health check-up of all citizens in restricted areas in Akola city