आरोग्य विभागात बायोमेट्रिक बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health department Biometric Mandatory

आरोग्य विभागात बायोमेट्रिक बंधनकारक

अचलपूर : कामकाजाच्या वेळेत दवाखान्यात नसणाऱ्या आणि या ना त्या कारणाने कामास दांडी मारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या उद्योगांना आवर घालण्यासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र तथा उपकेंद्राच्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे मेळघाटातील डॉक्टर व कर्मचारी अडचणीत येणार आहेत.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्र असो की जिल्हा रुग्णालय, सर्व प्रकारच्या सरकारी आरोग्यकेंद्रांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पगाराची बिले सादर करताना येथून पुढे बायोमेट्रिक हजेरीचाच आधार घेतला जाणार आहे.

राज्यातील आरोग्य संस्थांतील अधिकारी, कर्मचारी कामकाजाच्या वेळेत हजर राहत नाहीत तसेच मुख्यालयाच्या ठिकाणीही उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत. याबाबतीत तथ्य आढळून आल्यानंतर प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये व इतर आरोग्य संस्थांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली जाणार आहे.

सध्या जिल्ह्यातील काही रुग्णालयांत बायोमेट्रिक हजेरीची सोय आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी एकतर वेळेवर उपलब्ध होत नाहीत किंवा सुटीवर असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात, यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने यापुढे आधार लिंकिंग बायोमेट्रिक प्रणाली संबंधित संस्था कार्यालयात काम करणाऱ्या सिव्हील सर्जन, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मसिस्ट, वॉर्डबॉय, कर्मचारी यांच्या आधारकार्ड व पगाराशी जोडण्याच्या तसेच आधारकार्ड बायोमेट्रिकशी लिंक केल्याशिवाय पगार न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याबाबतचे आदेश मुंबई येथील आरोग्य संचालकांकडून धडकले आहेत. या निर्णयामुळे मेळघाटातील डॉक्टर, कर्मचारी अडचणीत येणार आहेत. मात्र नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.

सरकारी रुग्णालयात बहुतेक ठिकाणी बायोमेट्रिक हजेरीची सोय उपलब्ध आहे. मात्र ज्याठिकाणी बायोमेट्रिक हजेरी उपलब्ध नाही त्याठिकाणी तत्काळ बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

- डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक मुंबई.