Health workers did not get salaries from last six months
Health workers did not get salaries from last six months

कोविड योद्धे थकीत पगारासाठी मागणार भीक; वेतनानंतरच लस घेण्याचा कामगारांचा निर्धार

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 कंत्राटी कामगारांचे मागील 6 महिन्यांपासून पगार थकीत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी भीक मागण्याचा निर्णय घेतला आहे. जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. 21) दुपारी 12 वाजता भीक मागो आंदोलन होणार आहे. गांधी चौकातून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. थकीत वेतन मिळाल्यानंतरच कोरोनाची लस टोचून घेण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर गंभीर पेच निर्माण झाला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी मार्च 2019 मध्ये बेमुदत उपोषण केल्यानंतर त्यांना शासनाने किमान वेतन मंजूर केले. परंतु, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्यामुळे कामगारांना मागील दोन वर्षांपासून किमान वेतन लागू झालेले नाही. डॉ. मोरे यांच्याविरुद्ध जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने तीनवेळा कारवाई प्रस्तावित करूनही त्यांच्याविरुद्ध वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. 

निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे 500 कंत्राटी कामगारांना मागील दोन वर्षांपासून लागू झालेले किमान वेतन मिळत नसल्याने तसेच सहा महिन्यांपासून पगार थकीत असल्याने कामगारांमध्ये मोठा असंतोष आहे. कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रशासनाच्या सर्वच पातळीवर अनेकदा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनसुद्धा न्याय मिळालेला नाही.

त्यामुळे जनविकास कामगार संघाने आता आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. 6 महिन्यांचा थकीत पगार देण्यात यावा, दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन तातडीने लागू करण्यात यावे, या मागण्यांसाठी भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे. एक दिवस काम बंद करून सर्व कामगार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. पुढील सात दिवसांत कंत्राटी कामगारांना त्यांचे सहा महिन्याचे थकीत वेतन देण्याची तसेच किमान वेतन लागू करण्याची मागणी मंजूर न झाल्यास कामगारांचे आंदोलन तीव्र करण्यात येईल, देशमुख यांनी दिली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com