अतिवृष्टीने "अती'च केले! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नागपूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने फार नुकसान केल्याची वस्तुस्थिती हळूहळू उघडकीस येत आहे. नदीनाल्यांच्या पाण्याने शेतातील पिके खरडून नेली. काही ठिकाणी पावसाने घरे कोसळल्याच्या घटना पुढे येत आहेत. 

नागपूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने फार नुकसान केल्याची वस्तुस्थिती हळूहळू उघडकीस येत आहे. नदीनाल्यांच्या पाण्याने शेतातील पिके खरडून नेली. काही ठिकाणी पावसाने घरे कोसळल्याच्या घटना पुढे येत आहेत. 
कुही तालुक्‍यात सहा सप्टेंबरला झालेल्या पुरामुळे अनेक गावांत घरांची पडझड झाली, तर नदीनाल्यांच्या काठावरची पिके मुळासकट वाहून गेली. पुराचा फटका कुही तालुक्‍यातील सर्वच गावांना बसला असून आमनदी व कन्हान नदी तसेच खेंडा, हुडपा, देवळीकला या शिवारातून जाणाऱ्या नाल्याने परिसरातील 25 गावांच्या शेतकऱ्यांची पिके वाहून नेली. पुराच्या दिवशी मांढळ येथील पार्वताबाई निरगुळकर यांचे घर पडले. त्यात 2 पोती तांदूळ, 2 पोती गहू, टीव्ही, कुलर, पंखे व इतर संसारोपयोगी साहित्य मातीत दबले. घराचा पंचनामा तलाठी तभाने यांनी करताना मांढळचे सरपंच शाहू कुलसंगे, उपसरपंच सुखदेव जिभकाटे, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष विनोद, ठवकर, दक्ष नागरिक विष्णू खंडाळे, पोलिस पाटील खुशाल डहारे आदी उपस्थित होते. डोंगरमौदा येथील शांताराम ठाकरे यांच्या घराची भिंत कोसळली, तर अडम येथील सुमन धनराज खोब्रागडे या घराबाहेर पडताच संपूर्ण घर कोसळले. सुदैवाने त्या घराबाहेर येताच क्षणार्धात घर कोसळले. 
बोरी सदाचार येथील पुंडलिक भोयर यांच्या घराच्या भिंती कोसळल्या. शिवनी किन्ही, चिकणा, धामणा, कुही, खरबी, खोबना, पचखेडी, वेलतूर, चापेगडी, साळवा, वग, विरखंडी, डोंगरगाव, लांजाळा, दिपाळा राजोला आदी गावात पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच तालुक्‍यातून वाहणाऱ्या आमनदी, कन्हान नदी व छोटे मोठे नाले, जंगलालगतचे तलाव सतत दोन तीन दिवस "ओव्हरफ्लो' होते. त्यामुळे कुजबा, खेंडा, देवळी कला, नवेगाव, चिचघाट, मोहगाव, किन्ही, शिवनी, पचखेडी, मदनापूर, बोरी, विरखंडी, मांढळ, सावरखंडा, माळणी, टाकळी, खुर्सापार, पवनी, चिपडी, सातारा, मुरबी, चिकणा, धामणा, ठाणा, वेळगाव, दहेगाव केसोरी, चन्ना आदी गावांतील शेतकऱ्यांची पिके पुराने खरडून नेली. त्यामुळे तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्‍के नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्‍यातील जनता करीत आहे. 
सहा सप्टेंबरच्या पुरामुळे तालुक्‍यात अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने अहवाल पाठवावा. शासन शंभर टक्‍के नुकसानभरपाईसाठी निश्‍चितच सकारात्मक निर्णय घेईल. 
-सुनील जुवार 
तालुकाध्यक्ष भाजप 
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगतचे शेतकरी, पुरामुळे व वन्यप्राण्यांमुळे त्रस्त आहेत. शासनाने शंभर टक्‍केवारीनुसार नुकसानभरपाई द्यावी. 
-राजानंद कावळे 
जिल्हा सरचिटणीस, कॉंग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The heavy rain "just did!"