esakal | पाऊस आला मोठ्ठा आणि पिकांचा झाला तोटा! मुसळधार पावसाचे यवतमाळ जिल्ह्यात तांडव
sakal

बोलून बातमी शोधा

farm.

मारेगाव तालुक्‍यातील कुंभा महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या सुमारे दहा गावांत धुँवाधार पाऊस पडल्याने नाल्यालगतच्या शेतातील पिके खरडून गेली आहेत. तब्बल चार तासांत 55 मिमी पावसाची नोंद झाली. अनेक गावांजवळील नाल्यांना पूर आल्याने त्यांचा तालुक्‍याशी चार तास संपर्क तुटला होता. दरम्यान, या पावसाचा फटका बसलेल्या दहा गावांतील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे.

पाऊस आला मोठ्ठा आणि पिकांचा झाला तोटा! मुसळधार पावसाचे यवतमाळ जिल्ह्यात तांडव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुंभा (जि. यवतमाळ) : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. परिणामी शेतकरी कायम संकटातच. कधी पेरणीनंतर पाऊसच येत नाही आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येते. यंदा अती पावसाने झालेली पेरणीच वाहून गेली आहे. आणि शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत.

मारेगाव तालुक्‍यातील कुंभा महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या सुमारे दहा गावांत धुँवाधार पाऊस पडल्याने नाल्यालगतच्या शेतातील पिके खरडून गेली आहेत. तब्बल चार तासांत 55 मिमी पावसाची नोंद झाली. अनेक गावांजवळील नाल्यांना पूर आल्याने त्यांचा तालुक्‍याशी चार तास संपर्क तुटला होता. दरम्यान, या पावसाचा फटका बसलेल्या दहा गावांतील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे.

कुंभा महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या साखरा, महागाव, गदाजी बोरी, सिंधी, टाकळी, इंदिरा ग्राम, कोथुला, नरसाळा, गोंड बुराडा आदी गावांना पावसाने चांगले झोडपले. गावालगत असलेल्या जवळपास सर्वच नाल्यांना पूर आल्याने टाकळी येथील महिला शेतकरी विठाबाई गेडाम यांचा बैल पाण्यात बुडून दगावल्याने त्यांचे 40 हजारांचे नुकसान झाले. शेतातील पीक खरडून गेले, तर दुसरीकडे रामेश्वर येथील महेश भोंडे नामक शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यात पाणी शिरल्याने 20 बॅगा रासायनिक खत पाण्यात विरघळले. तर महागाव येथील शेतकरी उद्धव मिलमिले यांच्या शेतातील शेततळे अतिपाण्याने वाहून गेल्याने शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सिंधी येथील दशरथ डाहुले यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेत पूर्ण सपाट झाले आहे. गदाची बोरी येथील शेतकरी प्रवीण गोरकार, लता सायंकार, प्रफुल्ल गौरकार आदी शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, तर कोथुला येथील गावांना गावालगत नाल्याला पूर आल्याने ज्ञानेश्वर ढाकणे, दमयंती झाडे, मनीष ढाकणे, देवानंद माणुसमारे, वामन माणुसमारे, रघुनाथ माणुसमारे, अनिकेत ढाकणे, अनंत देऊळकर आदी शेतकऱ्यांची पिके पुराच्या पाण्यात संपूर्ण नेस्तनाबूत झाली आहेत. कपाशी, सोयाबीन, मका, मुंग, इत्यादी पिकांचे या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सविस्तर वाचा - ती शेतात रोवायला गेली अन्‌ महाविद्यालयातून आला फोन, मुलीबाबत विचारणा करताच आले भरून...

मारेगाव तहसीलदारांना निवेदन
कुंभा परिसरात अतिवृष्टी झाल्याने नाल्यालगतच्या शेतामधील पिके वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून पिकेही उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणून तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी मारेगाव पंचायत समितीच्या कुंभा गणातील सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख संजय आवारी यांनी मारेगावचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार