
ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी मंगळवारी हेल्मेट घालूनच कर्तव्यावर आले. त्याचबरोबर जनजागृती करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हेल्मेट घालून दुचाकी रॅली शहरातून काढली.
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : जिल्ह्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नववर्षाच्या प्रारंभी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनुसरून पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येताना हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातही गुरुवारपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा - बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या 'हे...
ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी मंगळवारी हेल्मेट घालूनच कर्तव्यावर आले. त्याचबरोबर जनजागृती करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हेल्मेट घालून दुचाकी रॅली शहरातून काढली. हेल्मेट न घातल्यामुळे आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू झाले. हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळेच जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलिस निरीक्षकांना दिल्या. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांनी सर्वांत आधी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केली. हेल्मेट सक्तीची मोहीम तालुक्यात अत्यंत प्रभावीपणे राबविली जाणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील दुचाकी चालकांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांनी सांगितले.