हेमाडपंती मंदिरे सांगतात गोसाव्यांची कहाणी, या शतकातील वारसा दुर्लक्षित 

Hemadpanthi temples tell the story of Gosavas
Hemadpanthi temples tell the story of Gosavas

 भंडारा : ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा वारसा सांगणारी अनेक स्थळे जिल्ह्यात आहेत. शहरातील मेंढा परिसरातील हेमाडपंती मठमंदिरे हेसुद्धा त्यातील एक. गिरी-गोसावी यांची अत्यंत कलात्मक, सुंदर मठ आणि मंदिर समूह या ठिकाणी आहेत. कालौघात या मंदिरांवर काजळी चढली असली तरी त्यांचे रेखीव सौंदर्य डोळ्यात भरणारे आहे. पुरातत्त्व विभागाने हा प्राचीन ठेवा आपल्या ताब्यात घेतला असून, त्याचे अस्तित्व व वारसा जतन करण्यासाठी आणखी विकासकामे करणे अपेक्षित आहे. 

या मंदिरात भगवान विष्णू, श्रीगणेश आणि विठ्ठल रुक्‍मिणीसह अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भंडारा शहराच्या वैभवात भर पाडणारे हे वास्तुशिल्प 800 वर्षे जुने असून, हेमाडपंती वास्तुशैलीने बांधलेले आहे. या मंदिर समूहाचे संवर्धन होण्याची गरज आहे. शंकराचार्यांनी विस्कळित गोसावी समाज संघटित व नियमबद्ध केला. चारही दिशांना दहा शिष्य बनविले. त्यांनी ठिकठिकाणी मठ, मठी स्थापन केल्या. त्यापैकी मेंढा येथील गिरी-गोसावी मठ व मंदिर समूह होय. 

यादवकाळात निर्मित हेमाडडपंती मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी वास्तव्य करू लागले. येथे मठाची स्थापना झाली. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी, गोविंदगिरी, शंकरगिरी महाराज यांच्या समाधी व स्मारक येथे बांधण्यात आले. सहाव्या पिढीपर्यंत येथे कुणीच महिला नव्हती. सातव्या पिढीपासून मठात स्त्रियांचा समावेश झाला. नवव्या पिढीतील गजानन गिरी व नंतर दहाव्या पिढीतील किशोर गिरी हे सध्या मंदिराची देखभाल करीत आहेत. 

मंदिराच्या देखभालीसाठी 2007 साली ट्रस्ट स्थापन करण्यात आले. मंदिराचे घुमट नक्षीदार असून, भिंती व कमानी आणि प्रवेशद्वार कलाकुसरीचे आहे. गणेशाची विविध रूपे मूर्तीच्या स्वरूपात विराजमान आहेत. पशुपक्षी, राक्षसे, पुष्प व सुंदर नक्षीकाम केलेली स्मारके विलोभनीय आहेत. 

असा आहे इतिहास 

बाराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीची राजा महादेव यादव यांच्या काळात त्यांचे मंत्री(हेमाडपंत) या विद्वान वास्तुशिल्पकाराने दगडावर दगड रचून चुनखडीच्या साहाय्याने मंदिर बांधण्याचे तंत्र विकसित केले. अशी अनेक मंदिरे राज्यात अनेक ठिकाणी बांधल्या गेली. ही मंदिरेसुद्धा याच वास्तुशैलीचा उत्कृष्ट असा नमुना आहेत. धर्मप्रसारार्थ आलेल्या बाबा चर्तुनाथ यांचा दैवी अनुग्रह लाभल्याने राजे रघुजी भोसले(नागपूर) यांनी त्यांच्या अधिनस्त असलेली गावे व जमीन दान दिली. त्यांनी या ठिकाणी आपले वास्तव्यस्थान निश्‍चित केले. बाबा चर्तुनाथ यांच्यानंतर छत्तरगिरी महाराज व पुढे अलोनी बाबा महंत झाले. जीवनात कधीच मीठ न खात नसल्याने त्यांना अलोनी बाबा असे नाव पडले. मेंढा येथील प्राचीन मंदिरालगतच मठात या सर्वांचे वास्तव्य होते. या प्राचीन मंदिरांची देखभाल, पौरोहित्य व उपासना, साधना या ठिकाणी करीत. देहावसान झालेल्या गोसावी साधू, महंतांच्या समाधी व स्मारके या ठिकाणी आहेत. मुख्य मंदिर हे यादवकालीन असून त्यावर बांधलेले सुंदर व कलात्मक घुमट हे भोसलेकालीन आहे. मोहाडी, नागपूर येथील शुक्रवारी पेठ, तुळशीबाग येथील वास्तूकलेशी त्यांची नाळ जुळल्याचे दिसून येते. मेंढा येथील मठात वास्तव्य असलेल्या अलोनी बाबांशी राजे रघुजी यांचे विशेष सौख्य होते. ते नेहमी त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी यायचे. तर कधी त्यांच्यासाठी पालखी पाठवून त्यांना नागपूरला बोलावून घ्यायचे. अलोनी बाबा यांच्यानंतर मुन्नेगिरी महाराज हे मठाचे चौथे महंत बनले. त्यानंतर पंचमगिरी महाराज, सूरजगिरी महाराज आले. सातव्या पिढीत गोविंदगिरी महाराज यांचे दत्तकविधान झाले. 

अतिक्रमणाचा विळखा 

या मठमंदिराच्या देखभालीसाठी गिरी गोसाव्यांना राजे रघुजी यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून मेंढा परिसर बहाल केला होता. पूर्वी या भागात तळे, बोड्या, पिकायोग्य जमीन, घनदाट वनराजीने व्यापलेला भूभाग होता. तळ्यात शिंगाडे, मासे यांचे उत्पादन घेणाऱ्यांकडून वार्षिक भाड्यापोटी ठराविक रक्कम घेतली जायची. तसेच शेतीमधील पिकातून होणाऱ्या उत्पन्नातून या मंदिरांची देखभाल केली जात होती. परंतु, काळाच्या ओघात या सर्व जमिनीवर व तळ्यावर अतिक्रमण झाले. आता गोसावी समाजाचे वारस असणाऱ्या लोकांनाच उत्पन्नाचे साधन उरलेले नाही. 

संरक्षित स्मारकाचा दर्जा 


पर्यावरण व इतिहासप्रेमी सईद शेख यांच्या पुढाकाराने येथे श्री. विष्णूमंदिर गोसावी ट्रस्टची स्थापना करून उपेक्षित व दुर्लक्षित असलेल्या वारशाचे जतन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाकडून राज्य संरक्षित स्मारक(वास्तू) म्हणून दर्जा मिळाला. सुरक्षाभिंत व इतर कामासाठी 73 लाख मंजूर होऊन सुरक्षाभिंत व फ्लोअरिंगचे काम करण्यात आले. पुढच्या टप्प्यातील जतन, जीर्णोद्धार व सौंदर्यीकरणाच्या कामासाठी शासनाकडून अद्याप निधी मंजूर न झाल्यामुळे ही कामे रखडली आहेत. जि.प. बांधकाम विभागाने पाहणी करून 25 लाख रुपयांचा आराखडा तयार केला. परंतु, काम अद्याप सुरू झालेले नाही. मागील वर्षी शंभो नारायण ग्रुपतर्फे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सुरक्षाभिंतीला प्रवेशद्वार नसल्याने येथे असमाजिक तत्त्वांचा संचार वाढला आहे. 


वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना 
यादवकालीन व भोसलेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही मठमंदिरे ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे साक्षिदार आहेत. हा वारसा जतन करण्याकरिता संवर्धन व सौंदर्यीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य अपेक्षित आहे. 
मो. सईद शेख 
संस्थापक अध्यक्ष 
ग्रीन हेरिटेज, भंडारा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com