राष्ट्रासाठी प्राणाहुती दिल्याचा गर्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर  : माझे पती नेहमी म्हणायचे, जवानास सीमेवर लढताना मृत्यू यावा, घरबसल्या येऊ नये. अन्‌ झालेही तसेच. माझ्या पतीने देशासाठी प्राणाहुती दिली. ते शहीद झाले. याचे दु:ख नव्हे तर देशरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिल्याचा अभिमान वाटतो. माझ्या मुलांनाही वडिलांचा गर्व आहे, अशा भावना वीरपत्नी मेहजबिना अख्तर यांनी व्यक्‍त केल्या.

नागपूर  : माझे पती नेहमी म्हणायचे, जवानास सीमेवर लढताना मृत्यू यावा, घरबसल्या येऊ नये. अन्‌ झालेही तसेच. माझ्या पतीने देशासाठी प्राणाहुती दिली. ते शहीद झाले. याचे दु:ख नव्हे तर देशरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिल्याचा अभिमान वाटतो. माझ्या मुलांनाही वडिलांचा गर्व आहे, अशा भावना वीरपत्नी मेहजबिना अख्तर यांनी व्यक्‍त केल्या.
प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे "हिरो ऑफ दि नेशन' पुरस्कार लान्सनायक नाजीर वाणी यांच्या वीरपत्नी मेहजबिना अख्तर यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, पन्नास हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. मंचावर लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, ब्रिगेडियर संजय नांद, संस्थेच्या अध्यक्ष शमा देशपांडे उपस्थित होत्या.
यावेळी हसनैन यांनी काश्‍मिरातील तरुणाला लष्कर किंवा पोलिस विभागात काम करायचे असल्यास किती अडचणींना सामोरे जावे लागते, याबाबत माहिती दिली. काश्‍मीरमधील लोक संशयाने बघतात. जवान आपल्या विरोधात असल्याची स्थानिकांची भावना असते. संचारबंदीत काम करणे अधिकच कठीण असल्याचे हसनैन म्हणाले. काश्‍मिरी लोक देशभक्‍त आहेत, हेच नाजीर वाणी यांनी दाखवून दिले. लष्करात भारतीयता हा एकच धर्म असून, तोच प्रत्येक जण पाळत असल्याचे हसनैन यांनी सांगितले. संजय नांद यांनी प्रहार समाजात जागृती करीत असून, ही चळवळ संपूर्ण देशात निर्माण होण्याची गरज व्यक्‍त केली. प्रास्ताविक प्लाइट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे यांनी केले.
देशाला 100 कर्नल देशपांडे हवेत
कर्नल सुनील देशपांडे यांनी प्रहार समाज जागृती संस्थेची स्थापना करून वैदर्भीय भूमीत राष्ट्रभक्‍तीची बीजे रोवली. आज वैदर्भीय तरुण मोठ्या संख्येने लष्करात दाखल होत आहेत. राष्ट्रभक्‍तीचा हा संदेश संपूर्ण देशात देण्यासाठी किमान शंभर कर्नल सुनील देशपांडे निर्माण होण्याची गरज आहे. असे झाल्यास देशाचे चित्र निश्‍चितच वेगळे असेल, असा विश्‍वास सय्यद अता हसनैन यांनी व्यक्‍त केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The "Hero of the Nation" award by the Prather Samar Awakening Institute