हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद रहेगा : सनी दोओल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 August 2019

नागपूर : "हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद हैं और जिंदाबाद रहेगा' हा गदर चित्रपटातील आपला डॉयलॉग ऐकवून सुप्रसिद्ध अभिनेते तसेच खासदार सनी देओल यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले.

नागपूर : "हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद हैं और जिंदाबाद रहेगा' हा गदर चित्रपटातील आपला डॉयलॉग ऐकवून सुप्रसिद्ध अभिनेते तसेच खासदार सनी देओल यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले.
मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे अखंड भारतदिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम्‌ गायनाच्या सक्करदरा चौकातील कार्यक्रमासाठी खासकरून आले होते. शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती बघून देओल चांगलेच उत्साहित झाले. भारताला संघर्षाने स्वातंत्र्य मिळाले आहे. याकरिता अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. याचा कधीही विसर पडू देऊ नका. आज येथे जमलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघता एक दिवस नक्कीच अखंड भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्‍वासही यावेळी सनी देओल यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, आमदार रामदास आंबटकर, नगरसेवक छोटू भोयर, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, डॉ. विलास डांगरे, माजी आमदार मोहन मते, रमेश शिंगारे, ईश्वर धिरडे, किशोर कुमेरिया, छोटू वंदिले, कैलास चुटे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, श्रीराम राज्य ढोल-ताशा पथकातर्फे वादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिकरीत्या वंदे मातरम्‌चे गायन झाले. यामध्ये एकूण 50 शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष ः गडकरी
काश्‍मीरचे 370 कलम रद्द केल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन संपूर्ण भारतीयांसाठी विशेष असल्याचे गडकरी म्हणाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्व अखंड भारताची प्रतिज्ञा घेण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजवर दरवेळी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी भारताला धमक्‍या यायचे. बॉम्बस्फोट घडवून आणायचे.
स्वातंत्र्यदिनी काश्‍मीर आज शांत आहे. येथील विशेष राज्याचा दर्जा समाप्त केल्याने खऱ्या अर्थाने भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. भविष्यात अखंड भारताचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा, असेही गडकरी म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindustan was alive, will remain alive: Sunny Deol