`अभिनव’ उपक्रमातून गरीबांची होळी गोड!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 March 2020

वैद्य गणेश कावरे यांच्या सेवा समितीचा पुढाकार; पुरणपोळी सकंलनाचे 20 वे वर्ष

अकोला : होळी...एकमेकांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याचा उत्सव...समाजातील एकोप्याचे रंग उधळण्याचे दिवस...या रंगात समाजातील दिनदुबळ्यांनाही सहभागी करून घेण्याचा अभिनव उपक्रम वैद्य गणेश कावरे यांच्या नेतृत्वात अकोल्यातील अभिनव सेवा समिती गेली 20 वर्ष राबित आहे. पुरणपोळी संकलन करून गरीबांना होळीच्या दिवशी दोन गोड घास मिळावे हा या उपक्रमा मागिल उद्देश. यावर्षी हा उपक्रम सोमवार, ता. 9 मार्च रोजी होळीच्या दिवशी शहरात सहा ठिकाणी राबवून काबाडकष्ट करणाऱ्या मंजुरांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

सण, उत्सवातील कालबाह्य परंपरा जपत अन्नाची नासाडी केली जाते. होळीच्या दिवशी एकीकडे होळीत पुरणपोळीचे नैवद्यं जाळले जातात तर दुसरीकडे त्यात दिवशी हजारो गरजू, उपेक्षितांंना पोटाची खळगी कशी भरावी, अशा प्रश्‍न पडलेला असतो. त्यांच्या या व्यथा जाणून अभिनव सेवा समितीने अकोल्यात 19 वर्षांपूर्वी एक उपक्रम सुरू केला. वैद्य गणेश कावरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमात समाजातील दानदात्यांकडून एक पुरणपोळी गोळा करून ती गरजूंपर्यंत पोहचविली जाते. कावरे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे हे 20 वे वर्ष आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळात शहरातील सहा केंद्रांवर पुरणपोळी संकलन केले जाते. पालकमंत्री डॉ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. संकलन केलेल्या पुरणपोळी शहरात काबाडकष्ट करणाऱ्या मंजुरांना वितरित केल्या जातील.

यांचे लाभत आहे सहकार्य
गणेश कावरे यांच्या या उपक्रमात ॲड. संतोष गोळे, बेबीनंदा निचळ, नाना उजवणे, संदीप ठाकरे, संजय क्षार, सुनील अवचार, वामनराव चोपडे, श्रीकृष्ण भिरड, मुकुंद धनभर, कैलास गोळे, डॉ. अशोक ओळंबे, प्रा. म्हैसने, प्रकाश फाटे, दिनकर घोडेराव, नितीन बदरखे, गजानन गोलाईत, अरूण मानकर, गजानन घोंगे, राजाभाऊ देशमुख, संतोष इंगोले, भुसारी, विलास खेडकर, गजानन मोरे, किशोर वडतकार, बनोले, नारायण उंबरकर, सुरेश राऊत, प्रमोद जोशी, गजानन लाखपूरकर, स्वप्नील कव्हळे, राजू मानकर, संजय कोटरवार, प्रवीण नागलकर, गजानन दांडगे आदींचे सहकार्य लाभत आहे.

दातृत्वाचा घ्या आनंद
समाजातील दिनदुबळे, काबाडकष्ट करणाऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न अभिनव सेवा समिती करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमात एक पुरणपोळी भेट देवून दातृत्वाचा आनंद तुम्हीही घेवू शकता. त्यासाठी शहरातील विविध भागात समितीचे सहा संकलन केंद्र सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत सुरू राहणार आहेत.

संकलन केंद्र
डाबकी रोड ः गोळे यांच्या स्वस्त धान्य दुकानाजवळ
डाबकी रोड ः फळके नगर
गोरक्षण रोड ः देवी प्लाझाजवळ
रामदासपेठ ः नाना उजवणे यांच्या घराजवळ
मोठी उमरी ः राष्ट्रीय शाळेजवळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holi sweet of the poor through 'Abhinav' program!