हे तर मरणाला आमंत्रण, कोरोना काळात घरपोच दारू नकोच!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

दारू न पिताच सामाजिक अंतराची शिस्त तोडणारी माणसे दारू पोटात व डोक्‍यात गेल्यावर घरी व अन्यत्र सामाजिक अंतराचे पालन करतील का? भारतात अशी पाच कोटी दारूग्रस्त माणसे आहेत. याचा अर्थ शासन 5 कोटी कोरोना प्रसारक समाजात घरपोच मोकळे सोडणार असल्याचेही ते म्हणाले.

गडचिरोली  : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्यामुळे दारू दुकानांसमोर झालेली गर्दी, लांब रांगा व सोशल डिस्टंन्सिंगची मोडतोड झालेली सर्वांनी पाहिली. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने "राज्यशासनांनी घरपोच दारू पुरवण्याचा विचार करावा' ही सूचना केली आहे. पण घरपोच दारूचा परिणाम घरपोच कोरोना, घरपोच हिंसा आणि पाच लक्ष मृत्यूच्या स्वरूपात देशाला भोगावा लागणार असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. शासन व न्यायालयाच्या या भूमिकेला दुरुस्त करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात पाठविलेल्या प्रतिक्रियेत डॉ. बंग यांनी म्हटले आहे की, कोरोना पसरू शकतो या भीतीने अनेक घरपोच सेवा बंद करण्यात आल्या. त्या न्यायाने घरपोच दारू म्हणजे "घरपोच कोरोना सेवा' ठरू शकते. दारू न पिताच सामाजिक अंतराची शिस्त तोडणारी माणसे दारू पोटात व डोक्‍यात गेल्यावर घरी व अन्यत्र सामाजिक अंतराचे पालन करतील का? भारतात अशी पाच कोटी दारूग्रस्त माणसे आहेत. याचा अर्थ शासन 5 कोटी कोरोना प्रसारक समाजात घरपोच मोकळे सोडणार असल्याचेही ते म्हणाले.

जाणून घ्या - शहर म्हणजे 'कोरोना'ची उपराजधानी; माफ करा... आम्ही तुम्हाला गावात येऊ देणार नाही

निव्वळ आर्थिक परिभाषेत बोलायचे तर अनेक तज्ज्ञांनी दारूमुळे उत्पन्नापेक्षा समाजाला जास्त मोठी किंमत चुकवावी लागते, असे दाखवून दिले आहे. पीजीआय, चंदीगढ या भारत सरकारच्या शिखर संस्थेच्या तज्ज्ञांनी (डॉ. शंकर प्रिंजा, राजेशकुमार) आंतरराष्ट्रीय नियतकालिकात याचा हिशेब प्रकाशित केला आहे. त्यानुसार 2011 ते 2050 या 40 वर्षांत भारतातील सरकारांना दारूपासून जितका कर मिळेल त्यापेक्षा दरवर्षी अडीच लक्ष कोटी रुपये किंवा देशाच्या जीडीपीच्या पावणेदोन टक्के एवढे जास्त नुकसान होईल.

देशाच्या आरोग्यावर भारतातली सर्व शासने मिळून खर्च करतात 1.2 टक्का जीडीपी व दारूमुळे कर वजा जाता नुकसान पावणेदोन टक्‍के जीडीपी. दारूचे अर्थशास्त्र हे वस्तुतः अनर्थशास्त्र आहे. जगात आज होणाऱ्या एकूण रोग, मृत्यू व अपंगत्वाच्या सर्वोच्च सात कारणांमधे दारू एक आहे.

क्लिक करा - आग्रहाखातर तो सासरी राहायला गेला; मात्र, पत्नीचे दुसऱ्याशी सूत जुळल्याने घडला थरार...

संधी गमावू नये

कोरोनामुळे आजपर्यंत देशात 2 हजार मृत्यू झाले. दारूमुळे दरवर्षी पाच लाख व तंबाखूमुळे दहा लाख मृत्यू होतात. कोरोनाच्या निमित्ताने दारू व तंबाखूबंदी किंवा कमी झाल्यास अनेक पट मोठा फायदा होईल. शासनाने, समाजाने ही आलेली संधी गमावू नये, अशी सूचनाही डॉ. बंग यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home delivery of wine is wrong decision