esakal | आम्हाला जगू द्या, आमची आर्थिक लूट थांबवा
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

दवाखान्यांनी लूट थांबवावी व शासकीय दरापेक्षा अधिक आकारलेले शुल्क परत करावे, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने पैसे परत करण्यास भाग पाडतील, असा इशारा मनसे अमरावती शाखेने दिला आहे.

आम्हाला जगू द्या, आमची आर्थिक लूट थांबवा

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती : कोरोना संक्रमित रुग्णांची काही खासगी रुग्णालयांकडून आर्थिक लूट करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली असून या दवाखान्यांनी लूट थांबवावी व शासकीय दरापेक्षा अधिक आकारलेले शुल्क परत करावे, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने पैसे परत करण्यास भाग पाडतील, असा इशारा मनसे अमरावती शाखेने दिला आहे.


शासनाने निर्धारित करून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने केलेल्या लेखा परीक्षणात त्यामध्ये तथ्य आढळून आले आहे. या अनुषंगाने मनसेने आक्रमक पवित्रा घेत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. शहरातील खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिल आकारून ते वसूल करण्यात येत आहे. काही रुग्णालयांतील डॉक्‍टर रुग्णांच्या नातेवाइकांशी मुजोर भाषेचा वापर करीत आहेत. काही खासगी हॉस्पिटल शासननिर्णयाला न जुमानता जादा बिल आकारत असल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.

वाचा - व्यायाम करीत असलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला, क्षणात झाले होत्याचे नव्हते

ज्या रुग्णालयांनी जादा बिल घेतले असेल अशा हॉस्पिटलने रुग्णांना ते तत्काळ परत करावे, अन्यथा मनसे आपल्या स्टाइलने त्यांना धडा शिकवण्यासाठी तत्पर आहे, असा इशारासुद्धा देण्यात आला. या वेळी महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, शहराध्यक्ष गौरव बांते, जनहित कक्ष जिल्हा संघटक प्रवीण डांगे, उपजिल्हा अध्यक्ष गजानन काजे, मनविसे राज्य कार्यकारिणी सदस्य सुशील पाचघरे, उपशहर अध्यक्ष नीतेश शर्मा, सुरेश चव्हाण, मनविसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, बबलू आठवले, वेदांत ताल्हन, राजेश धोटे, मनीष दीक्षित, रोशन शिंदे व अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - नरेश शेळके

loading image
go to top