शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न! जगायचे तरी कसे; पिकले ते खपत नाही; पेरले ते उगवत नाही

सूरज पाटील
सोमवार, 29 जून 2020

अख्ख्या जगाचे अर्थचक्र थांबले असताना शेतकरी मात्र, शेतात राबताना दिसला. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा खरेदीला सुरुवात झाली. त्यातही कमालीचा गोंधळ झाला. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या खरेदी केंद्रावर जावे लागले. तिथेही त्यांची लूट करण्यात आली. नेर तालुक्‍यातील शेतकऱ्याची वणीत झालेली हेळसांड एकूणच व्यथा मांडणारी आहे.

यवतमाळ : अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजले आहे. सत्ता कुणाचीही असली तरी नागवला जातो तो शेतकरीच. मागील हंगामात शेतात पिकविलेला माल घरात आला. मात्र, विक्रीसाठी कमालीचा संघर्ष करावा लागला. तर, या खरीप हंगामात पेरलेले बियाणे उगवले नाही. पिकलं ते खपत नाही; पेरलं ते उगवत नाही. आमचा जन्म नागवण्यासाठी झाला का, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.

मागील काही वर्षांपासून नापिकीचे संकट पिच्छा सोडत नाही. एक हंगाम साथ देईल आणि कर्जाचा बोजा कमी होईल, या अपेक्षेने शेतकरी काळ्यामायच्या सेवेत घाम गाळत आहे. कमी उत्पन्न झाले की, भाव मिळतो आणि जास्त उत्पन्न झाले की, हमीभावाच्या नावाने बोंबाबोंब राहते. मग कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी वाढतच जातो. गेल्या वर्षी निसर्गाने साथ दिल्याने समाधानकारक उत्पन्न हाती लागले. शेतातून निघालेला माल घरात साठविण्यात आला. कापूस, सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत असताना कोरोना नावाचे संकट आले. लॉकडाउनमुळे हा माल घरातच पडून राहिला.

अख्ख्या जगाचे अर्थचक्र थांबले असताना शेतकरी मात्र, शेतात राबताना दिसला. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा खरेदीला सुरुवात झाली. त्यातही कमालीचा गोंधळ झाला. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या खरेदी केंद्रावर जावे लागले. तिथेही त्यांची लूट करण्यात आली. नेर तालुक्‍यातील शेतकऱ्याची वणीत झालेली हेळसांड एकूणच व्यथा मांडणारी आहे.

सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. माल अजूनही घरात पडून आले. अनेक शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही. बॅंकांकडून पीककर्जासाठी नकारघंटा वाजविण्यात आली. घरातील सोने सराफाकडे गहाण ठेवले. सावकाराकडून खासगी कर्ज काढले. कशीबशी पेरणी आटोपली. मात्र, त्यातही पेरलेले बियाणे उगवले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गंभीरतेने कुणीही बोलत नसल्याने जगायचे तरी कसे, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.

शेतकरी दुहेरी संकटात
कोणताच हंगाम शेतकऱ्यांना साथ देत नाही. मागील वर्षी निघालेला माल अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. यंदा तर बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
सुभाष राठोड
शेतकरी, बोदेगाव, ता. दारव्हा

पाऊस बेभरवशाचा
कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळाल्याने पेरणीसाठी नवीन पीककर्ज शेतकऱ्यांना मिळाले नाही. बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याने धोकाच दिला आहे. पाऊसही बेभरवसाचा झाला आहे.
राम ढोबळे
शेतकरी, जांब, ता. यवतमाळ.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to live? ask farmers