दुर्दैवी! अन्न पाण्यावाचून पडून होता आजारी अवस्थेत; कोणी हात लावण्यासही नव्हते तयार; अखेर घडले माणुसकीचे दर्शन

humanity of muslim people helped man who was ill since five days
humanity of muslim people helped man who was ill since five days

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : "कोविड-१९' या महामारीने माणसा माणसाला, शेजारी शेजाऱ्याला आणि नातेवाइकाला नातेवाइकांपासुन दूर नेले आहे. त्यामुळेच एका रुग्णाला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी कुणीच पुढे यायला तयार होत नव्हते. मात्र, नटवर शर्मा या सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीला मुस्लिम समाजातील युवकांनी पुढे येऊन शहरात असलेल्या सामाजिक सौहार्दतेचे दर्शन घडविले.

शहरातील गांधी वॉर्डातील रहिवासी असलेला एक रुग्ण गेल्या पाच-सहा दिवसांपासून अन्नपाण्यावाचून आपल्या घरी आजारी अवस्थेत होता. घरी म्हातारे आईवडील साधारणतः पंच्याहत्तरीच्या आसपास. त्यात आईला पॅरालिसीस झाल्यामुळे आई पलंगावर, तर वडील एका पायाने दिव्यांग असल्यासारखे. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा मरणासन्न अवस्थेला पोहोचलेला. आपल्या मुलाला कुणीतरी दवाखान्यात दाखल करावे, यासाठी त्याच्या वडिलांची धडपड सुरू होती. त्यासाठी शहरातील नेते, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व शेजारी अशा सर्वांचीच दारे त्यांनी ठोठावली. परंतु, काहीच उपयोग झाला नाही. 

त्याला कारणही तसेच होते. कोरोना विषाणुमुळे जग पछाडले आहे, तेव्हा या रुग्णाला कोरोना तर नाही ना, या भीतीने कोणीच पुढे येऊन मदत करायला तयार होत नव्हते. दरम्यान, वडिलांनी त्यांच्याच समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब टाकली. तेव्हा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सुरेश कव्हाळे व डॉ. संजय तोडासे यांच्याशी संपर्क साधून रुग्णाला कोरोनामुळे कोणीही हात लावायला तयार नाहीत, रुग्णाने गेल्या पाच-सहा दिवसांपासून अन्नही ग्रहण केले नसल्याचे सांगितले. 

त्यानंतर तहसीलदार कव्हाळे यांनी लगेच डॉ. संजय तोडासे यांना रुग्णाच्या घरी पाठवून तपासणी करून रुग्णालयात दाखल करण्याबाबत सांगितले. परंतु, प्रश्‍न पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा येत होता. कोरोनामुळे रुग्णवाहिकेचे संचालकही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी टाळाटाळ करीत होते.

कोणीही हात लावायला तयार नव्हते

दरम्यान, शहरातील सामाजिक कार्यकर्ते नटवर शर्मा यांना ही बाब समजताच, ते रुग्णाच्या घरी दाखल झाले. त्यांनी स्वत:च रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. परंतु, या रुग्णाला रुग्णवाहिकेत उचलून टाकायला कोणी पुढे येत नव्हते. तेव्हा नटवर शर्मा यांनी अनेकांशी संपर्क साधला. परंतु, कोणीही हात लावायला तयार नव्हते. मग नटवर शर्मा यांनी त्यांच्या परिचयातील मोहसीन खोकर, अतिक शेख, शाहरुख कुरेशी, अकीब अली या चार मुस्लिमबांधवांशी संपर्क केला असता, त्यांनी लगेच घरी येऊन रुग्णाला रुग्णवाहिकेत टाकून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करीत मानवतेसोबतच सामाजिक सौहार्दाचा परिचय करून दिला.

अश्रू गाळीत आईवडिलांनी मानले आभार

एरवी आपणच आपल्या समाजाचे खरे नेते-पुढारी आहोत, असा टेंभा मिरवणारे बरेच आहेत. मात्र, त्यांनी आपल्याच समाजातील एका गरजू रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नजरा फेरल्या, त्यांच्याबाबत आता काय म्हणावे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र, दुसरीकडे इतर समाजातील मोहसीन खोकर, अतिक शेख, शाहरुख कुरेशी, अकीब अली या चार तरुणांनी सामाजिक कार्यकर्ते नटवर शर्मा यांच्या हाकेला प्रतिसाद देत "त्या' तरुण रुग्णास वेळीच रुग्णालयात दाखल केले, त्याबद्दल रुग्ण तरुणाच्या आईवडिलांनी या सर्वांचे डोळ्यातील अश्रू गाळून आभार मानले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com