लाकडे तोडून आणल्यावरच पेटते त्यांच्या घरातील चूल...मग उज्ज्वला योजनेचा फायदा काय?

पवनी : गॅस नसल्याने स्वयंपाकासाठी वापरात असलेली चूल.
पवनी : गॅस नसल्याने स्वयंपाकासाठी वापरात असलेली चूल.

पवनी (जि. भंडारा) : स्वयंपाक घरात राबणाऱ्या गृहिणींना मोठ्या सन्मानाने अन्नपूर्णा, असे म्हटले जाते. त्यांच्या जीवनातील होरपळ व फरपट संपावी, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात आली. तथापि तालुक्‍यातील शेकडो महिला आजही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. दिवस उजाडताच रानमाळात, शेतावर जाऊन लाकडे तोडून आणल्यानंतरच त्यांच्या घरातील चूल पेटत आहे. शेकडो महिला आजही धुरामुळे होणाऱ्या त्रासाचा वनवास भोगत आहेत. 

स्वयंपाकघरात राबणाऱ्या महिलांना धुराचा सर्वाधिक त्रास होतो. ओल्या, सुक्‍या लाकडाचा धूर डोळ्यात, नाकातोंडात जातो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, श्‍वसनाचा त्रास व पुढे फुफ्फुसाचे विकारसुद्धा होऊ शकतात. महिलांना धुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात आली. गॅस जोडणी व सवलतीच्या दरात सिलिंडर मिळाल्याने हजारो महिलांच्या आयुष्यात या योजनेमुळे आशेचा किरण उजाडला. परंतु, अनेक गरजवंत महिला उज्ज्वलाच्या या लाभापासून वंचित आहेत.

इंधनाचा खर्च कसा करावा

टाळेबंदीच्या काळात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीन महिने मोफत सिलिंडर दिले जात आहे. परंतु काही महिलांना आजही उज्ज्वला गॅस कनेक्‍शन मिळालेले नाही. घरादाराची स्थिती पाहूनच ज्यांची गरिबी आणि निकड लक्षात येते, अशा खऱ्या गरजवंतांवर आजही अन्याय होत असल्याचे चित्र आहे. परिणामी घरातली चूल पेटावी म्हणून त्यांना पायपीट करून लाकडे आणावी लागतात. ताडेश्‍वर वॉर्डातील गरजू महिलांनी उज्ज्वलातून गॅस सिलिंडरचे कनेक्‍शन मिळावे म्हणून अर्ज केला होता. त्यातील फक्त दोघांनाच लाभ मिळाला. सध्या रेशन कार्डावर केरोसीन मिळणे बंद झाले आहे. अभयारण्यामुळे जंगलातून लाकडेही आणता येत नाही. अशा परिस्थितीत चूल कशी पेटवावी, इंधनाचा खर्च कसा करावा, असा प्रश्‍न शेकडो महिलांसमोर आहे.


दारिद्य्ररेषेखाली असूनही वंचित

ताडेश्‍वर वॉर्डातील ललिता भाजीपाले ही पतीसह मोलमजुरी करून संसाराचा गाडा रेटते. घरात सहा जण आहेत. त्यामुळे त्यांच्या सकाळ-सायंकाळच्या स्वयंपाकासाठी बरेच इंधन लागते. निकषात बसत असताना दारिद्य्ररेषेखालील असूनही तिला उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला नाही. ललिताबाई गेल्या 15 वर्षांपासून चुलीवरच स्वयंपाक करते. तुरजा शेंडे हीसुद्धा त्यातलीच. उन्हाळ्यात पायाला चटके अन्‌ जिवाची काहिली करणारे ऊन तर पावसाळ्यात सरपटणाऱ्या साप, विंचवाचे भय उराशी बाळगून त्यांना लाकडे आणावीच लागतात. ओल्या लाकडामुळे स्वयंपाक करताना सारख्या धुरामुळे डोळ्यांना त्रास होतो. या वॉर्डातील अशी शेकडो कुटुंबे निकषात बसूनही त्यांना उज्ज्वलाचा लाभ मिळालेला नाही.


अर्ज करून लाभ मिळाला नाही
उज्ज्वला योजनेचा लाभ मिळावा म्हणून स्वस्तधान्य विक्रेत्यामार्फत अर्ज केला होता. परंतु, अजूनही गॅस कनेक्‍शनचा लाभ मिळालेला नाही. शेतामधून 2 ते 3 किलोमीटर पायपीट करून डोक्‍यावर मांडून लाकडे आणावी लागतात. पावसाळ्यात ओल्या लाकडांमुळे डोळ्यांना धुराचा त्रास होतो. अनुदानित गॅस घेण्याची ऐपत नसल्याने चुलीवरच दिवस काढावे लागत आहेत.
- ललिता भाजीपाले.

रेशन दुकानदाराने फॉर्म घेऊन परत पाठविले
गॅस कनेक्‍शनसाठी अर्ज केला होता. वय जास्त आहे, असे म्हणून रेशन दुकानदाराने फॉर्म घेऊन परत पाठविले. हातपाय थकल्याने मला लाकडांसाठी बाहेर जाणे शक्‍य होत नाही. लाकडे कधी मिळतात कधी मिळत नाही. केरोसीनही मिळत नाही. दोन दिवस पाऊस आल्याने लाकडे ओली झाली. त्या दिवशी चूल पेटली नाही.
- तुरजा शेंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com