esakal | दोन तपानंतर ब्राह्मणी बंधाऱ्याचा कायापालट; शंभरावर शेतकऱ्यांना मिळणार पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेलू तालुक्यातील झडशी शिवारातील तब्बल शंभरवर शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे. बंधाऱ्याची देखरेख ही ग्रामपंचायतकडे सुपूर्द करून सिंचन विभागाकडून महसूल गोळा केला जाणार आहे.

दोन तपानंतर ब्राह्मणी बंधाऱ्याचा कायापालट; शंभरावर शेतकऱ्यांना मिळणार पाणी

sakal_logo
By
कपिल जयस्वाल

झडशी (वर्धा) : सेलू तालुक्‍यातील कोल्हापुरी बंधाऱ्याची दैन्यावस्था झाली आहे. यामुळे बंधाऱ्यात पाणी साठवण होत नाही. या संदर्भात येथील नागरिकांनी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेने या बंधाऱ्याकडे लक्ष दिले. तब्बल २० वर्षांपासून उपेक्षित असलेल्या बंधाऱ्याचा अखेर कायापालट झाला. याकरिता लघु पाटबंधारे विभाग यांचे सहकार्य लाभले.

या बंधाऱ्याला जवळपास २० दरवाजे असून १०० गेट आहेत. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून ९९ फळ्या बसविण्यात आल्या. त्यामुळे या शिवारातील तब्बल शंभरवर शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे. बंधाऱ्याची देखरेख ही ग्रामपंचायतकडे सुपूर्द करून सिंचन विभागाकडून महसूल गोळा केला जाईल, अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाचे राऊत यांनी दिली.

जाणून घ्या : बेरोजगारीचे भीषण रूप! गरज दहावी पास उमेदवारांची; लागल्या पदवीधरांच्या रांगा

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून सात लाख रुपये

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून या बंधाऱ्याला सात लाख रुपये उपलब्ध करून दिले. वर्धा जिल्ह्यातील १३० कोल्हापुरी बंधाऱ्याचा जीर्णोद्धार संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. यावेळी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे गटप्रमुख राजेंद्र खर्चे, जिल्हा संधारण अधिकारी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कृष्णमोहन राव, जलसंधारण अधिकारी चेतन राऊत, उपविभागीय जलसंधार अधिकारी लघु पाटबंधारे विभाग हिंगणघाट येथील अभय कठाळे, जलसंधार अधिकारी लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेचे वाघमारे, सहायक प्रकल्प अधिकारी यशवंत मुंगुले यांची उपस्थिती होती.

अवश्य वाचा : आता विकेल तेच पिकेल! शेतकऱ्यांचा माल पोहोचणार ग्राहकांच्या दारात; प्रत्येक तालुक्‍यात शंभर विक्री केंद्रे

प्रमोद शेंडे यांनी केली होती निर्मिती

गत काही वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार स्व. प्रमोद शेंडे यांनी ब्राह्मणी गावाजवळ पूल कम बंधारा निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. आता त्याला नूतनीकरण करण्याची गरज होती. असे असताना याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले या बंधाऱ्यामुळे नागरिकांना लाभ होणे अपेक्षित होते. पण, या बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने त्याचा लाभ होत नव्हता. आत झालेल्या दुरुस्तीमुळे याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्‍त होत आहे.


(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

loading image