या जिल्ह्यातून अवैध दारू चालली गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात...अनेक तस्कर सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

गडचिरोली जिल्ह्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदी लागू झाली असली; तरी या दोन्ही जिल्ह्यांतील तळीरामांची हौस भागविण्यासाठी दारूतस्कर नवनवी शक्‍कल लढवत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातून गेवर्धामार्गे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली.

कुरखेडा (जि. गडचिरोली) : छत्तीसगड, तेलंगणा राज्यांतून सुरू असलेल्या दारूतस्करीचा लंबक आता गोंदिया जिल्ह्याकडेही सरकला आहे. या जिल्ह्याची दारू कुरखेडा तालुक्‍यातील गेवर्धामार्गे थेट चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचविण्याची कसरत तस्कर करीत आहेत. पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका मोठ्या कारवाईत ही गंभीर बाब उघडकीस आली आहे.

तालुक्‍यातील गेवर्धामार्गे जिल्ह्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मध्यरात्री गेवर्धा मार्गावर सापळा रचून दारू वाहतूक करीत असलेली पाच दुचाकी वाहने तसेच 1 लाख 27 हजार 600 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू, असा एकूण 3 लाख 22 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली; मात्र दोन आरोपी वाहन व दारू तिथेच सोडून जंगलाच्या दिशेने अंधारात पळून गेले.

दोनाडा येथे दोन आरोपींना अटक

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातून गेवर्धामार्गे जिल्ह्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली होती. मध्यरात्री गेवर्धा तलावाजवळ पोलिसांनी सापळा रचला. दोनाडा (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथील आरोपी राजू खोबरागडे व दिलीप खोबरागडे हे दुचाकीने (क्र. एमएच 33 झेड 0747) 700 देशी दारूच्या बाटल्या (किंमत 42 हजार रुपये) वाहतूक करीत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह अटक केली.

नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीने दारूची वाहतूक

त्याचवेळी याच गावातील आरोपी गुड्डू खोबरागडे व प्रवीण खोबरागडे हे दुचाकीने (एमएच 34 एक्‍यू 4374) 500 देशी दारूच्या बाटल्या व दोन विदेशी दारूच्या मोठ्या बाटल्या अशी एकूण 31 हजार 600 रुपयांच्या मद्यसाठ्याची वाहतूक करीत असताना आढळून आले. त्यांनाही मुद्देमालासह अटक करण्यात आली. याच मार्गावर तालुक्‍यातील चिखली येथील हेमराज जनबंधू व विक्रांत जनबंधू हे बाप-लेक नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीने अवैध देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून 200 बाटल्या (किंमत 12 हजार) दारू व दुचाकी जप्त करीत अटक करण्यात आली.

अन्‌ बापलेक जंगलाच्या दिशेने पळाले

रात्री याच मार्गावर चिखली येथीलच महेंद्र कुमरे व रघुराम कुमरे हे बाप-लेकसुद्धा दुचाकी (क्र. एमएच 33 झेड 1311) ने 200 देशी दारूच्या बाटल्या (किंमत 12 हजार रुपये) अवैधपणे वाहतूक करीत असताना पोलिसांचा सापळ्यात अडकले. तसेच एमएच 33 एल 21334 या दुचाकीने दोन अज्ञात आरोपी पोलिस चमूला दिसून आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी वाहन घटनास्थळावरच सोडत अंधारात जंगलाच्या दिशेने पळ काढला. या वाहनाची तपासणी केली असता 30 हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या 500 बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी असा एकत्रित 1 लाख 27 हजार 600 रुपयांचा मद्यसाठा व 3 लाख 22 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 8 आरोपी अटक केली.

जाणून घ्या : चंद्रपूर ब्रेकिंग : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आणखी दोन वाघांच्या मृत्यूने खळबळ

कोरोनाची सुसंधी

सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना रोगाची साथ संकट ठरत असली; तरी हेच संकट दारूतस्करांसाठी सुसंधी ठरत आहे. लॉकडाउनमुळे दारूटंचाई निर्माण झाल्याने दारूचे भाव तिप्पट, चौपट वाढले आहेत. त्यामुळे तस्करांना कमी माल आणून जास्त लाभ मिळवता येतो. त्यामुळे दारूबंदी असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात दारूतस्करी करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal liquor came from this district to Gadchiroli, Chandrapur district