विदेशी नाही तर आपली देशीच बरी...गावागावात दारूचे अड्डे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

संचार बंदीचे उल्लंघन करून गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रास दारू गाळून त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. कोरची तालुक्‍यात सोमवारी (ता.20)मुक्तिपथ गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुलेटीपदीकसा येथे धाड टाकून तब्बल 60 लिटर गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी महिलेसह तिघांवर कारवाई करण्यात आली.

गडचिरोली  : लॉकडाऊनमुळे लगतच्या राज्यातून देशी, विदेशी दारूची तस्करी करण्यात अडचण येत असल्यामुळे दारू विक्रेत्यांनी आपला मोर्चा आता मोहफुलाच्या हातभट्टीकडे वळविला आहे. त्यातच आता कोरोनामुळे गावागावात सतर्कता असल्याने जंगलाला दारूचे अड्डे बनविले असून मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू काढण्यात येत असल्याने पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान गडचिरोली तालुक्‍यातील पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा तब्बल 1500 किलो मोहसडवा पोलिसांनी ताब्यात घेतला.
संचार बंदीचे उल्लंघन करून गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रास दारू गाळून त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. कोरची तालुक्‍यात सोमवारी (ता.20)मुक्तिपथ गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुलेटीपदीकसा येथे धाड टाकून तब्बल 60 लिटर गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी महिलेसह तिघांवर कारवाई करण्यात आली.
येथील एक महिला अनेक दिवसांपासून घरीच मोहाची दारू गाळून त्याची विक्री करीत होती. परिणामी आसपासच्या गावातील लोक मुलेटीपदीकसा या गावी दारू पिण्यासाठी गर्दी करायचे. यामुळे गावाचे सामाजिक आरोग्य धोक्‍यात आले होते. गाव प्रशासनाकडून तिला वारंवार सूचना देण्यात आल्या. तरीही दारू गाळून ती विक्री करीतच होती. विशेष म्हणजे छत्तीसगड येथून दोन मजुरांना बोलावून त्यांच्या मदतीने ही दारू गाळली जात होती. सध्या लॉकडाऊन सुरू असून असे अवैध धंदे तत्काळ पूर्ण बंद करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे. तरीही महिलेने दारू गाळणे सुरूच ठेवल्याने गाव संघटनेच्या कार्यकर्त्यानी तिच्या घरी धाड टाकली असता 60 लिटर मोहाची दारू, मोहसडवा आणि दारू गाळण्याचे साहित्य सापडले. दारू विक्रीसाठी दारू विक्रेते नवनवीन शक्कल लढवीत आहे.                                              विटा भट्टींच्या नावाखाली दारूनिर्मिती
 देशी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याचेही पोलिस तपासात आढळून आले.
गडचिरोली तालुक्‍यातील पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा तब्बल 15 क्विंटल म्हणजेच 1500 किलो मोहसडवा पोलिस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. वडसा शहरातील शिवाजी वॉर्डमध्ये युवकांनी कोरोना पथक तयार केले आहे.  शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी हे युवक लक्षं ठेवून आहेत. वॉर्डमधील काही लोक विसोरा येथे दारू पिण्यासाठी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. युवकांनी त्यांचा पाठलाग करीत एका विक्रेत्यांच्या घरी मुक्तिपथ गाव संघटनेचे कार्यकर्ते आणि तालुका चमू यांच्या सहकार्याने धाड टाकली असता तब्बल 10 क्विंटल मोहफुलाचा सडवा मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतला.

सविस्तर वाचा - अशी वेळ कोणावरही येऊ नये...कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करणा-या कर्मचा-याच्या भावना
मुक्तीपथकडून अनेक ठिकाणी धाडी
दारू विक्रीला आळा घालण्यासाठी गावागावात तयार करण्यात आलेल्या मुक्तीपथ संघटनेच्या कार्यकर्त्याकडून अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात सिरोंचा, अहेरी, भामरागड, कोरची, एटापल्ली, कुरखेडा, गडचिरोली, चामोर्शी व धानोरा या नक्षलग्रस्त तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात मोहफुलापासून दारू तयार केली जात असल्याचे प्रकार समोर आले. जंगलात दारूचे अड्डे असल्याच्या तक्रारी वन कर्मचाऱ्यांकडे ग्रामस्थांकडून येत आहेत. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यात सध्या देशी, विदेशी दारू विक्रीला आळा बसला असला तरी मोहफुलाच्या दारूने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
....................


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal Production of desi liquor in Gadchiroli