या तालुक्‍यात वनतस्करांना रान मोकळे...मोठमोठ्या झाडांचीही होते कत्तल

यशवंत शेंडे
Sunday, 19 July 2020

सालेकसा तालुक्‍याच्या बोदलबोडी येथील वनविभागाच्या जागेतून वनतस्कर मोठ्या प्रमाणात मुरूम, वाळूची अवैध वाहतूक आहेत. शिवाय मोठमोठ्या झाडांची अवैधरीत्या कत्तलही करीत आहेत. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, याकडे क्षेत्रसहायकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

सालेकसा (जि. गोंदिया) : तालुका हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आहे. या तालुक्‍याला वनवैभव लाभले आहे. चौफेर हिरवीगार वनराई आहे. त्यामुळे तस्करांना रान मोकळे झाले आहे. या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनोपजांची अवैध वाहतूक ही नेहमीचीच झाली असताना विभागाचे लक्ष का जाऊ नये, हा प्रश्‍न कायम आहे.

याच तालुक्‍यातील बोदलबोडी येथे वनविभागाची जागा आहे. या जागेतून मुरूम, वाळूची अवैध वाहतूक तर होतेच शिवाय मोठमोठ्या झाडांची सर्रास कत्तलही केली जात आहे. साखरीटोलाचे क्षेत्र सहायक यांच्याकडे या भागाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांचे या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. याचाच परिणाम म्हणून वाळू तस्करांचे फावले आहे.

वनोपजांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले

उल्लेखनीय म्हणजे, क्षेत्र सहायक हे गोंदिया येथून ये-जा करीत असल्याची माहिती आहे. ते मुख्यालयी राहात नसल्याने त्यांच्या कार्यकाळात वनोपजांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, वनविभागाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. आतापर्यंत एकाही तस्करावर कारवाई करण्यात आली नाही. हे येथे उल्लेखनीय आहे. क्षेत्र सहायकांच्या कार्यकाळात अवैध वीटभट्ट्यांना उधाण आले. जंगलतोड होऊ लागली आहे. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या क्षेत्रसहायकाला हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

असे का घडले? - इज्जत वाचविण्यासाठी तिने घेतला रुद्रवतार आणि मग काय घडले?

कार्यालयात कधीही येणे अन्‌ कधीही निघून जाणे

गोंदिया येथून ये-जा करीत असलेल्या क्षेत्रसहायकांना कार्यालयीन वेळेचे भान नाही. ते दुपारी 12 नंतर कार्यालयात पोहोचत असतात. सायंकाळी चार ते पाच वाजले की कार्यालय सोडत असतात. त्यामुळे अशा घटनांना अधिक वाव मिळतो.

उपवनसंरक्षकांचा भ्रमणध्वनी स्वीच ऑफ

या प्रकाराच्या सत्यतेबाबत गोंदियाच्या उपवनसंरक्षकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी स्वीच ऑफ होता.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal tree felling in Bodalbodi