दिलासा !! चंद्रपूरकरांनो! मालमत्ताकर भरा आता डिसेंबरपर्यंत

tax
tax

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. त्यामुळे महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी आता डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी (ता. 30) झालेल्या आमसभेत घेण्यात आला.

मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाउन करण्यात आले. यामुळे जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्वच क्षेत्रे कुलूपबंद झाली होती. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. या काळात उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे मालमत्ता कर भरणे अनेकांना शक्‍य झाले नाही. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक घडी विस्कळित झालेल्या चंद्रपूरकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना सत्ताधाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आजच्या सभेत खुद्द महापौर राखी कंचर्लावार यांनी चंद्रपूरकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

गुंठेवारी, शाळांचे समायोजन, गंजवॉर्डातील भाजी बाजारात पार्किंग शुल्क आकारणी करणारे कंत्राट अशा विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.

महापालिकेच्या राणी हिराई सभागृहात तब्बल तीन महिन्यांनंतर आमसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनियुक्त आयुक्त मोहिते यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अजेंड्यावरील विषयाला सुरुवात झाली.
त्यानंतर महाराष्ट्र गुंठेवारी विकास या विषयावर चर्चा करण्यात आली. शहरातील अनेक प्रभागात कृषी जमिनीची प्लॉट पाडून विक्री केली जात आहे. यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत असल्याची बाब नगरसेविका सुनीता लोढिया यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

गुंठेवारीच्या विषयाला दोन वर्षांकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, खुले भूखंड, रस्ते या सुविधा असतील, तरच गुंठेवारीतून मंजुरी देण्यात येणे अपेक्षित असल्याचे आयुक्त मोहिते यांनी सांगितले. मनपाकडे 4 हजार 512 गुंठेवारीची प्रकरणे आली होती. त्यातील 153 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती संबंधित विभागाचे अभियंता यांनी दिली.

मनपाच्या तीन शाळांचे समायोजन करण्याचा विषय ठेवण्यात आला. त्यानंतर शाळांमध्ये मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

लॉकडाउन काळात मनपातर्फे डब्बे वितरित करण्यात आले. यासंबंधी नगरसेवक धनराज सावरकर यांनी विषय उपस्थित करताच महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केले. तसेच डंपिंग ग्राउंडवरील बायो मायनिंगच्या कामात अनियमितता असताना चर्चा न करता सभा संपल्याचे जाहीर केल्यामुळे कॉंग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया, संगीता भोयर यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविला.

डब्बे वितरणात घोळ
लॉकडाउन काळातील 31 दिवसांत मनपाने 5 लाख 68 हजार डब्बे वितरित केले. या डब्बे वितरणात मोठा घोळ झाला आहे. कचरा डेपोतील बायो मायनिंगच्या कामातसुद्धा मोठी अनियमितता आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा न करता सभा संपल्याचे जाहीर करून महापौरांनी बहिर्गमन केले.
पप्पू देशमुख,
नगरसेवक, चंद्रपूर.

डब्बे वितरणात भेदभाव नाही
सभेत सर्व विषयांवर विस्तृतपणे चर्चा झाली. डब्बे वितरणात कोणताच भेदभाव झाला नाही. लॉकडाउन काळात गरजू कुटुंबातील कुणीही उपाशी राहू नये, हाच एकमेव उद्देश मनपाचा होता. डंपिंग यार्डप्रकरणातील कंपनीने कामे पूर्ण केल्यानंतर देयके मंजुरीसाठी सादर केली. प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच बिले अदा करण्यात आली. विरोधकांकडून या प्रकरणाला केवळ वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राखी कंचर्लावार
महापौर, मनपा चंद्रपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com