esakal | कोरोना संसर्गाचा धोका वाढला!
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे. परदेशी न जातात जिल्ह्यातील तेरा नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त नागरिकाच्या संपर्कातील चार नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना संसर्गाचा धोका वाढला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे. परदेशी न जातात जिल्ह्यातील तेरा नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त नागरिकाच्या संपर्कातील चार नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने लोकांना घरी राहण्याचे सांगण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास अत्यावश्‍यक कारण वगळता बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे, मुंबई व इतर महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील तेरा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शहरात सहा तर पातूरात सात पॉसिटिव्ह
अकोला शहरातील बैदपुरा परिसरात मंगळवारी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर अकोट फाईलमध्ये सुद्धा कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. गुरुवारी पातूर येथील सात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळाल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नऊ वर पोचली होती. परंतु कोरोना ग्रस्त आढळलेल्या पहिल्याच रुग्णाच्या कुटुंबातील चार सदस्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरणाग्रस्त रुग्णांची संख्या तेरावर जाऊन पोहोचली आहे. संबंधित रुग्णांपैकी एकाही रुग्णाने विदेशवारी न केल्यामुळे जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

निर्जंतुकीकरण सुरू
बैदपुरा व अकोट फाइल परिसरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे परिसरातील घरांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासोबतच परिसरातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुद्धा महापालिका प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.

परिसर सील
महापालिका हद्दीतच सहा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्यावतीने दोन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यासोबतच पातूर शहर सुद्धा पूर्णतः सील करण्यात आले आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी घरातच रहा
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता संचार बंदीच्या नियमाचे पालन करावे. आपल्या परिसरात कोणी सर्दी, ताप, खोकल्याने ग्रस्त असल्यास यासंबंधी प्रशासनाला माहिती द्यावी.
- जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी, अकोला