esakal | Video : ठाकरे सरकार तरी न्याय देणार का? वाचा कुणाचा आहे प्रश्‍न... 
sakal

बोलून बातमी शोधा

Video : ठाकरे सरकार तरी न्याय देणार का? वाचा कुणाचा आहे प्रश्‍न... 

जड धान व बारीक असल्याने बाजारात त्याला मोठ्या प्रमाणात किंमत येईल व आपल्याला थोडाफार फायदा होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी याच धानाची बिजाई रोवली. जड धानाला सामान्य धानापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पाणीही जरा जास्त लागते. अशात शेतकऱ्यांनी सतत तीन महिने प्रचंड मेहनत घेतली. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा धानाचे पीक निघाले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

Video : ठाकरे सरकार तरी न्याय देणार का? वाचा कुणाचा आहे प्रश्‍न... 

sakal_logo
By
संदीप रायपुरे-नीलेश झाडे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : बिजाई रोवली महाराष्ट्रातील उच्च प्रतीच्या तांदळाची. परंतु, प्रत्यक्षात पीक निघाले ते तेलंगणातील निकृष्ट धानाचे. बाजारात हे धान कुणी घ्यायला तयार नाही आहे. धान बघताच कृषी उत्पन्न बाजार समितीनेही हात झटकले. घरी लाख रुपयांचे धान आहे. परंतु, बंदिस्त पिकाकडे बघत आसव ढाळण्याशिवाय पर्यायच नाही. संताप काढावा तरी कुणावर हा विषय आहे. राज्यात ठाकरे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. ते तरी आपणास न्याय देणार का, या आशेच्या प्रश्‍नावर शेतकरी आहेत. 

पूर्व विदर्भ हा धानपट्ट्याचा म्हणून प्रचलित आहे. नवनवीन धानाच्या बिजाई आल्या अन्‌ विविध प्रकारच्या व्हेरायटीच्या धानाचे शेतकरी उत्पन्न घेऊ लागले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज होता. तो खराही ठरला. यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी तयारी केली. गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी यावेळी केशर नावाच्या धानाची बिजाई रोवली. ही बिजाई महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या तांदळाची असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगण्यात आले.

क्लिक करा - क्लिक करा - चालकाला लागली डुलकी अन्‌ घडले आक्रित...

हा जड धान व बारीक असल्याने बाजारात त्याला मोठ्या प्रमाणात किंमत येईल व आपल्याला थोडाफार फायदा होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी याच धानाची बिजाई रोवली. जड धानाला सामान्य धानापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पाणीही जरा जास्त लागते. अशात शेतकऱ्यांनी सतत तीन महिने प्रचंड मेहनत घेतली. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा धानाचे पीक निघाले तेव्हा त्यांना धक्काच बसला. 

कारण, निघालेला तांदूळ हा जाड होता. त्यांनी अधिकची चौकशी केली असता धानाची ही बिजाई तेलंगणातील निघाली. यामुळे महाराष्ट्रातील उच्च दर्जाचे धान अन्‌ उत्पन्न निघाले ते तेलंगणातील निकृष्ट तांदळाचे. बाजारात हे धान विकायला गेले तर व्यापारी घ्यायला तयार नाही. धान तेलंगणातील आहे. तो जाड आहे. याला भाव मिळणार नाही म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीनेही हात वर केले.

सविस्तर वाचा - घरात सुरू होती लग्नाची तयारी आणि 'तो' बोहल्यावर चढण्यापूर्वीच...

धानाचे पीक घरातच ठेवण्याची वेळ

प्रचंड मेहनतीने घेतलेले धानाचे पीक आपल्याच घरात ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गोंडपिपरी तालुक्‍यातील एकट्या धानापूर गावात साधारणपणे वीस ते तीस शेतकऱ्यांवर ही आफत ओढावली आहे. गोंडपिपरीसह लगतच्या तालुक्‍यातही अशाच अनेक घटना समोर आल्या आहेत. 

हा प्रकार अतिशय निंदनीय
गरीब शेतकऱ्यांना फसविण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणाची तातडीने चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी. 
- सूरज माडूरवार, 
अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, गोंडपिपरी

बाजार समितीने दिला नकार
गोंडपिपरी येथील कृषी केंद्रातून आम्ही केशर नावाच्या धानाची बिजाई घेतली होती. हाती आलेले उत्पन्न मात्र वेगळ्याच जातीच्या धानाचे आले. गावातील काही शेतकऱ्यांनी धान विकायला बाजार समितीला नेले. मात्र, धान खरेदी करण्यात बाजार समितीने नकार दिला. तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. 
- रूपेश साळवे, 
शेतकरी, धानापूर