Video : मुख्याध्यापिकेने दिली ही अमानवी शिक्षा... विद्यार्थिनींना चालणेही झाले मुश्कील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय शाळेत इयत्ता सहावी ते दहावीचे वर्ग आहेत. येथे 195 मुली शिक्षण घेत आहेत. 18 फेब्रुवारीला शाळा सुरू होण्यापूर्वी 11 वाजताच्या सुमारास प्रतिज्ञा आणि राष्ट्रीय गीत झाल्यानंतर मेडिटेशनदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनी प्रात्याक्षिकच्या वह्या आणण्याकरिता दुसऱ्या मजल्यावरील वर्गात गेल्या. यादरम्यान चालण्याच्या आवाजाने मुख्याध्यापिका दुशीला मेश्राम संतापल्या. त्यानंतर सर्व 38 विद्यार्थिनींना वर्गखोलीचा दरवाजा बंद करून कान धरून उठाबशा करण्याची शिक्षा सुनावली.

चिमूर (जि. चंद्रपूर) : समाजकल्याण विभागाद्वारे चालविल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका दुशीला मेश्राम यांनी दहावीच्या 38 विद्यार्थिनींना अमानवीय दंड बैठकांची शिक्षा दिली. त्यामुळे विद्यार्थिनींच्या पायांना सूज आली. त्यामुळे चालताना वेदना होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकारानंतर संबंधित मुख्याध्यापिकेवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय शाळेत इयत्ता सहावी ते दहावीचे वर्ग आहेत. येथे 195 मुली शिक्षण घेत आहेत. 18 फेब्रुवारीला शाळा सुरू होण्यापूर्वी 11 वाजताच्या सुमारास प्रतिज्ञा आणि राष्ट्रीय गीत झाल्यानंतर मेडिटेशनदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनी प्रात्याक्षिकच्या वह्या आणण्याकरिता दुसऱ्या मजल्यावरील वर्गात गेल्या. यादरम्यान चालण्याच्या आवाजाने मुख्याध्यापिका दुशीला मेश्राम संतापल्या. त्यानंतर सर्व 38 विद्यार्थिनींना वर्गखोलीचा दरवाजा बंद करून कान धरून उठाबशा करण्याची शिक्षा सुनावली.

 

 

एवढेच नाही, तर प्रात्यक्षिक घेणार नसून, शून्य गुण देण्याची धमकी दिली. मेश्राम या एवढ्यावरच थांबल्या नाही, तर प्रत्येक वर्गखोलीसमोर नेऊन विद्यार्थिनींकडून उठाबशा करायला लावल्या. विद्यार्थिनी रडू लागल्यानंतरही मुख्याध्यापिका शांता झाल्या नाही. यानंतर विद्यार्थिनींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

शासकीय अनुसूचित जाती निवासी शाळेतील प्रकार
या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनींना चालणे, पायऱ्या चढ-उतर करताना त्रास होऊ लागला. त्यामुळे वसतिगृहाच्या प्रभारी अधीक्षक प्रीती जामगडे यांनी रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, बाह्य रुग्णालय बंद असल्याने विद्यार्थिनी उपचारासाठी गेल्या नाही.

Video : बॉक्‍सर मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी वाजवला 'डीजे', हे आहे कारण...

सुबोधी सर्वज्ञान घुटके, संगिनी प्रज्ञाशील गेडाम, साक्षी देविदास मालके, सुप्रिया कणिला सुखदेवे, सानिया प्रभू खोब्रागडे, नंदिनी अशोक रामटेके या सहा विद्यार्थिनींचा त्रास वाढल्याने जामगडे यांनी महिला रक्षकासह 21 फेब्रुवारीला त्यांना ऑटोने उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉ. गेडाम यांनी विद्यार्थिनींची तपासणी केली. यावेळी विद्यार्थिनींनी सर्व आपबीती कथन केली. त्यानंतर डॉ. गेडाम यांनी पोलिस विभाग आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर प्रकार उघडकीस आला. परीक्षा तोंडावर असून, हा प्रकार घडल्याने विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राष्ट्रगीताला विद्यार्थिनी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे सर्व विद्यार्थिनींना शिक्षा केली. मात्र, दोनशे उठाबशा मारायला लावल्या नाही.
- दुशीला मेश्राम,
मुख्याध्यापिका, शासकीय अनुसूचित जाती निवासी शाळा, चिमूर

 

निवासी शाळेतील सहा विद्यार्थिनी उपचारासाठी आल्या. तपासणीत पाय आखळलेले आढळून आले. चार तास निरीक्षणात ठेवल्यानंतर सुटी दिली. मुख्याध्यापिकेने शिक्षा केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिस, शिक्षण विभागाला माहिती दिली.
- डॉ. गेडाम,
वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inhuman punishment given by principal at chimur