अमरावतीत कुणाची होणार चौकशी आणि कशासाठी? वाचा...

सुरेंद्र चापोरकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

घोटाळ्यात सामिल कंत्राटदारांना देण्यात आलेल्या देयकांची वसुली करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे व अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

अमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल पोलिसांना पुढील कारवाईकरीता सोपविण्यात येणार आहे. या घोटाळ्यात सामिल कंत्राटदारांना देण्यात आलेल्या देयकांची वसुली करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे व अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

बडनेरा झोनमध्ये हा घोटाळा घडला असून तो तब्बल 2 कोटी 34 लाख रुपयांवर पोहोचल्याचा अहवाल उपायुक्त सुरेश पाटील यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय चौकशी समितीने दिला आहे. या अहवालानंतर कारवाईची पुढील दिशा स्पष्ट करताना मनपा आयुक्तांनी संस्थेतून गेलेला पैसा परत कसा मिळवता येईल, याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कंत्राटदारांकडून तो वसूल करण्यावर भर देणार असल्याचे व त्यासाठी कोणते मार्ग आहेत हे शोधण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा - अभिनंदनीय! अमरावतीच्या शिक्षकांच्या कार्याला राष्ट्रीय 'बहुमान'

या आर्थिक घोटाळ्यातील कारवाईचे स्वरूप निश्‍चित नसले तरी प्रशासकीय कारवाई महापालिकेस करायची आहे. लेखा विभागातील कनिष्ठ लिपिक अनुप सारवान व बडनेरा झोनमधील कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर संदीप राईकवार या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महापालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांनी देयकावरील स्वाक्षरी नाकारली आहे. ती आपली असल्याचे कुणीच कबूल करीत नाही. मात्र देयक मंजूर होत असताना व ती अदा करण्यापर्यंत कुणाच्याच लक्षात ही बाब कशी आली नाही अनाकलनीय असल्याचे नमूद करतानाच आयुक्तांनी स्वास्थ निरीक्षक ते सहायक आयुक्त अशा सर्वांनीच अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला. या सर्वांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मात्र त्यांनी दिला.

संपादन - नरेश शेळके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry of Officers in Amravati Municipal corporation