esakal | पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

बोलून बातमी शोधा

null
पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती ः राज्य शासनाने 18 फेब्रुवारी 2021 चा शासननिर्णय 20 एप्रिल 2021 रोजी रद्द केल्यामुळे पोलिस शिपाई पदाच्या आंतरजिल्हा बदलीला देण्यात आलेली स्वीकृती रद्द झाली. त्यामुळे पोलिस शिपायांचे झालेले प्रमोशनसुद्धा आता थांबले आहे.

राज्य शासनाने 26 ऑक्‍टोबर 2017 मधील तरतुदीनुसार पोलिस आयुक्त अमरावती शहर यांच्या आस्थापनेवर आंतर जिल्हा बदली आस्थापना मंडळाच्या मान्यतेने स्वीकृती दिली होती. त्यामुळे आयुक्तालयातील 92 पोलिस शिपायांना नाईक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्याकारणाने रिक्त झालेली शिपायांची पदे आंतरजिल्हा बदली करून भरण्यात येणार होती.

आंतरजिल्हा बदली करून आयुक्तालयात येणाऱ्या पोलिस शिपायांची संख्या 92 इतकी होती. राज्य शासनाने एक दिवसापूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार पोलिस शिपाई यांना पोलिस नाईक पदी दिलेली बढती ही आता सेवाज्येष्ठतेनुसार द्यावी, असे म्हटले आहे. त्यानुसार अमरावती पोलिस आयुक्तालयामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार शिपायांना पदोन्नती मिळणार आहे.

नवीन नियुक्ती मिळेपर्यंत पदोन्नती झालेल्या नाईक यांना पुन्हा शिपाई पदावर राहावे लागेल. अमरावती आयुक्तालयात बदलून येणाऱ्या महिला व पुरुष शिपायांमध्ये बहुतांश विदर्भातील होते. तर बोटावर मोजण्याइतकीच संख्या मुंबई येथून अमरावतीत येणाऱ्यांची होती. ही परिस्थिती केवळ पोलिस आयुक्तालयापुरतीच नाही तर अनेक जिल्ह्यांची यापेक्षा वेगळी अवस्था झाली.

त्यामुळे नवीन आदेशाने पोलिस अंमलदार यांना आंतरजिल्हा बदलीवर देण्यात आलेली स्वीकृती रद्द करण्यात आल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये तसेच ज्या पोलिस अंमलदारांना कार्यमुक्त करण्यात आले आहे, अशांना आस्थापनेवर हजर न करता त्यांना त्यांच्या मूळ घटकात परत करण्यात येईल, असे पत्र पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी काढले.

संपादन - विवेक मेतकर