दुर्वेशच्या सायकलची आंतरराष्ट्रीय झेप; राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनीत महाराष्ट्राला सुवर्णस्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

national award News

दुर्वेशच्या सायकलची आंतरराष्ट्रीय झेप; राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनीत महाराष्ट्राला सुवर्णस्थान

national award News मांजरखेड (जि. अमरावती) : सन २०२१ -२२ अंतर्गत राष्ट्रीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनी नुकतीच दिल्ली येथे घेण्यात आली. राष्ट्रीत प्रदर्शनीमध्ये राज्यातील ३१ अवार्डीने सहभाग नोंदविला असून यामधून नऊ विद्यार्थी जपान येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये धामणगाव तालुक्यातील दुर्वेश कोंडेकार या विद्यार्थ्याच्या पेरणी करणारी सायकलने राज्यातून द्वितीय क्रमांकांचा मान पटकावीत थेट आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे.इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनीच्या निमित्याने दुर्वेशची सायकल विमानातून जपानचा फेरफटका मारणार आहे.

मागील वर्षी पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये धामणगाव रेल्वे छत्रपती हायस्कूलचा विद्यार्थी असलेला दुर्वेश कोंडेकारने पेरणी करणारी सायकल व टेम्ब्रुसोडा आश्रमशाळेची प्रीती कासदेकरच्या नारळ खरडणी यंत्राचे सादरीकरण केले.राज्यस्तरीय प्रदर्शनीमध्ये दोन्ही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत दुर्वेशची सायकलने द्वितीय क्रमांकांचा मान पटकावीत दिल्लीत आपला झेंडा उंचावला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा तसेच त्याच्या मधील संशोधन गुणाला चालना मिळावी म्हणून दरवर्षी इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन केल्या जाते.जिल्हा,राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर ही प्रदर्शनी भरविल्या जात असून विद्यार्थ्यांना प्रयोगाकरिता विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये निधी दिल्या जातो.सहभागी विद्यार्थ्यांपैकी १० %विद्यार्थ्यांची वरिष्ठ स्तरावरील प्रदर्शनीकरीता निवड केली जाते.

दिल्ली येथे विविध राज्यातून सुमारे सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते ,यामधून सुमारे साठ विद्यार्थी जपान येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.छत्रपती हायस्कूल धामणगाव रेल्वे येथील इयत्ता दहावी मधील दुर्वेश अनिलराव कोंडेकार याने सायकलचा वापर करून पेरणी यंत्र तयार केले आहे.मुख्याध्यापक एच एम रोंघे व विज्ञान शिक्षक राजेश्वर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्वेशने ही अनोखी सायकल बनविली आहे.विशेष म्हणजे दुर्वेशच्या अनोख्या सायकलचा वापर शेतातील प्रत्यक्ष पेरणीदरम्यान केला आहे.

यश शिंदे सुवर्ण पदकाचा मानकरी

या स्पर्धेत कोल्हापूर येथील यश शिंदे या विद्यार्थ्याच्या ‘ऑटोमेटिक प्लेट एंड बाऊल कलेक्टिंग एंड वाशिंग मशीनने’ स्पर्धेत अव्वल स्थान पटकावीत सुवर्ण पदाचा मान मिळवला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मान महाराष्ट्राला तर रजत पदकाचा मान उत्तर प्रदेश ला मिळाला आहे.

दूर्वेश कोंडेकार या विद्यार्थ्याने आपल्या शाळेच्या माध्यमातून शिवाजी शिक्षण संस्थेचा लौकिक वाढवला आहे.भविष्यात त्याच्या संशोधनासाठी व पेटंट संदर्भात शिवाजी शिक्षण संस्था सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.

- हर्षवर्धन देशमुख, अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती